postbox media

Thursday 14 November 2019

दगडाच्या देशा

दगडाच्या देशा..

नेहमीच्या रस्त्याकडेच्या वाटेवर एका राजस्थानी भंगारवाल्याचे दुकान लागते. मी अधुन मधुन काही पुस्तके मिळतात का तिथे म्हणून सहज फेरी मारत असतो. कॉलेजात असताना हीच भंगारवाल्यांची दुकाने माझ्या साठी लायब्ररी चे काम करुन जायची
.'स्वस्तात मस्त' असे. साहीत्याच्या प्रकाराच्या भानगडी त्या वेळी मला ठावूक नसायच्या अगदी चंपक, चांदोबा,हिंदी सिनेमा गीते, मराठी बहारदार चित्रगीते ,मराठी वाण्गमयाचा गाळीव इतीहास ते उर्दू साहीत्य विश्वकोश, शंकर पाटील,पुल,कुसुमाग्रज, असे अनेक साहीत्यीक, कवी- नवकवी, विद्रोही, सुद्धा इथेच भेटले मला, लोकांच्या घरी अडचण झाली के हे साहीत्यीक या दुकानात भेटायचे मला, थोडक्यात समृद्ध जिवनात अशी ठिकाणे अडगळीचीच असतात, पुस्तकांच्या रिटायर्डमेंट ची ठरावीक अशी आयुश- वये सांगता येणार नाहीत मला, पण वजन काटा मारण्याच्या अनेक पध्दती पासुन भंगाराचे समाजकारण,राजकारण ते अर्थकारण सार काही दुनियादारी या इथेच शिकलो मी, राजस्थानी साहीत्य,संस्कृती ची ओळख या इथेच भंगारवाल्या माझ्या राजस्थानी मित्रांकडुन कडुन झाली.
आज 'कामगार डे' च्या दिवशी हे दुकान चालु होते.वेळ होता म्हणुन गेलो, मालक न्हवता आज, मालकाच्या पाठीमागे त्याचे दुकान संभाळणारा 'गोलु' नावाचा मुलगा बिहार वरुन त्याच्या कडे कामाला आला होता. हे पोरग तसे दहा बारा वर्षाचे, काळे सावळेसे ,मी गेलो तेह्वा हे पुस्तकात तोंड खुपसुन काही तरी वाचत बसले होते. मी हळुच त्याचे त्याच्या नकळत फोटो घेतले. काही वेळाने माझ्याकडे निरागस बघत क्या चाहीये असे त्याने मला विचारले?? मी बोललो सेठ को मिलना हे. सेठ शाम को आयेगा असे बोलुन तो पुन्हा काम करु लागला. मी तो पर्यंत त्याचे नाव गाव विचारुन झालो. अभ्यासाची खुप आवड पण घरची परीस्थीती त्याला मुंबईला खेचुन घेवून आली. शाळेत जाता आले नाही तरी इथेच बसुन जे मिळेल ते वाचुन अभ्यासाची आपली तहान भागवतो. महाराष्ट्रातील अनेक शिक्षण सम्राट यानी 'महात्मा फुले, सावित्रिबाई फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा सांगत स्वता:ची विद्यापीठे , आंतरराष्ट्रीय शाळा स्वता:ची नावे राजकीय व्यासपीठावर मोठी करायला वापरली, त्याना अशा शिक्षणापासून वंचीत मुलांसाठी काहीच करता येवू नये अशी ही 'सार्व शिक्षा' थोडक्यात शिक्षणाची ' सारवा सारव' या यांत्रीक शिक्षणसंस्था पध्दतीतुन रोबोट तयार करण्याचे कारखाने तयार झालेत. दफ्तर आणी पालकांच्या इछा अपेक्षा लादलेली ही निरागस मुले देखील आज मला 'अधिकृत बालकामगार' च वाटू लागली आहेत, 'बालकामगार कायदा मोठा की गोलु आणी त्याच्या परीस्थीतीची, जवाबदारीची त्याची जाणीव, त्याचा संघर्ष ? काहीच कळत न्हवते. गोलु च्या जिद्दीला सलाम मनातुनच दिला. जिवणातील हाच संघर्ष त्याचे 'शिक्षण' त्याला येणारे अनुभव त्याचे 'मार्गदर्शक शिक्षक' ठरणार आहेत. डोक्यावरचा सुर्य जास्त तळपू लागला होता, इतक्यात हातातल्या महागड्या मोबाईल वर 'दगडाच्या देशाचे आणी कामगार डे' चे मेसेजेस येत होते. दगडाच्या देशातील लोकांच्या सामजीक जाणीवा का इतक्या बोथट झाल्या आहेत हे त्या 'रद्दीकडे' पाहून कळायला लागले. सत्तेच्या संघर्षात हे असे अनेक प्रश्न जाहीरनाम्या पुरतेच राजकारण्यानी ठेवलेत. वर्तमान पत्रापेक्षा पुरवण्याची तहान वाचकाना भागत नाही. आणी ती पुरवणे हा 'व्यवसाय' झाला आहे. सरकारी आकडेवारी ही मटक्याच्या धंद्या सारखी झालीये त्या मुळेच असे गहण प्रश्न स्वातंत्र्यानंतर ही तसेच भिजत पडले आहेत. ज्या दिवशी या महाराष्ट्रात असा कोणी गोलु 'कामगार' दिसणार नाही त्या दिवसानंतर दगडाच्या देशाचे मेसेजेस मी पुढे पाठवत जाईन असे मनाशी ठरवून टाकले.
क्या 'दिया' हमे, क्या सिखायेगा 'जलना'
..जलकर हमने सिखा हे 'दिया' बनना !!

वैभव जगताप