postbox media

Showing posts with label #society #social #socialist #socialism. Show all posts
Showing posts with label #society #social #socialist #socialism. Show all posts

Saturday 15 August 2020

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती

श्युर स्वीटहार्ट, संध्याकाळी लवकर येतो, मंगतराम पेट्रोलपंप च्या बाजूला गजानन वडापाव आहे बघ तिथे तू थांब, मी तुला तिथूनच पिकअप करतो, मस्त तिथूनच डिनर ला जाऊया. असे बोलत राहुलने लॅपटॉप वर कसलेसे टुकटुक केले आणि खाली बघत पुन्हा मोबाईल फोन वर वैष्णवी ला म्हणाला, आई आणि विनय ला पण सोबत घेणार आहेस का? 
" नाही रे, पलीकडून वैताग वाला आवाज. कानावरचा फोन तसाच ठेवत वैष्णवी ने दुसऱ्या हातातला रिमोट आपटला. आणि विनय आणि आई ला न घेता बाहेर जायचा बेत फायनल झाला. संध्याकाळी राहुल ने गजाननच्या इथून वैष्णवीला पिक अप केले, तिथून डिनर साठी आस्वाद ला जायचे होते, आई आणि विनय घरी होते आणि त्यातून डिनर ला जायला नेहमी सारखाच उशीर झाला होता, त्यात कुठची अवदसा घडावी घाई गडबडीत राहुल ने पुढचा सिग्नल तोडाला, त्याच्या हि गोष्ट लक्षात होती पण टाईमिंग या वेळी मात्र त्याचे  चुकले होते. तिथेच जवळच ड्युटीवर उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसाने त्याची गाडी अडविली. त्यानंतर वादावादी आणि पुन्हा पावती फाडण्याचा योग राहुल ला आला. ट्रॅफिक पोलीस कसे हफ्ते घेतात, कायदा शिकवू नका मला, तुमच्या पेक्षा जास्त समजतो मला आणि तुम्ही  ड्युटी कशी निट बजावत नाहीत, झोपा काढता म्हणून अपघाताचे प्रमाण कसे वाढले आहे, आपली काहीच चुक न्हवती, आपण कसे चुकीचे नाही, सर्व यंत्रणा, खड्डे, टोल वसुली ते मंत्री कसे पैसे खातात याचे डोस प्रामाणिक ट्राफिक पोलिसाला देऊ लागला, खरा राग तर  पावती फाडल्याचा होता. चांगल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन राहुल एमबीए इन बिझनेस मॅनेजमेंट झाला होता. लग्नानंतर राहुल आई, सोळा वर्षाच्या विनय त्याचा मुलगा आणि धर्मपत्नी वैष्णवी यांसोबत स्टँडर्ड लाईफ जगत होता. एमएनसी कंपनी, लॅव्हिश लाईफ स्टाईल, हाय फाय टॉवर वाली सोसायटी यामध्ये ड्युप्लेक्स फ्लॅट. बाकी प्लॉट, शेअर मार्केट, आणि इतर गुंतवणूक बऱ्याच, एका यशस्वी शिक्षित नोकरदारांच्या कमीत कमी गरजा, अपेक्षा काय म्हणून एखादी गाडी असावी अशी एक पॉश कार हि आता दारात होती.
मला या देशाच्या सिस्टम चा प्रचंड राग येतोय. काहीही नियंत्रण नाही, जो तो आपापल्या मर्जीने वागतोय.. बघितलंस कसा माजोरडा होता तो पोलीस वाला, लायकी आहे का त्याची..सरकारी नोकऱ्या वशिल्याने मिळवलेले हे.. तुला सांगतो वैष्णवी या देशाचे काही होणार नाही...          " जावू दे रे.. राहुल.. किती त्रागा करतोयस इति वैष्णवी..  वैष्णवी कडे " हूँ.. असा कटाक्ष टाकत,' बास्टर्डस..' असे शब्द राहुल पुटपुटला. त्याचा तो राग बघून वैष्णवी काहीच बोलली नाही. 

काही दिवसानंतर..

( करोना चे संकट चीनच्या वुहान प्रांतातून जगात हळू हळू पसरत आहे अशा बातम्या टीव्ही वर झळकू लागल्या )
सकाळचा चहा घेऊन झाल्यावर राहुल ने कप डायनींग टेबल वर ठेवला आणि टीव्ही चे चॅनेल बदलू लागला. बिझनेस न्यूज बघत असताना विनय राहुल कडे गेला आणि म्हणाला ' पप्पा रंग पंचमी, होळी आलीये... ' तर मग?  राहुल ने टीव्ही बघत बघत उत्तर दिले. पापा... ऐकाना.. विनय वैतागून म्हणाला.. काय बोल ना बाळा... राहुल यावेळी थोडा पुत्र प्रेमाने मवाळ झाला. ते सोसायटीचे चेअरमन पाटील अंकल आहेत ना त्यांना सांगा ना प्लिझ.. राहुल म्हणाला, ' का काय झाले?  पप्पा तुम्हाला तर काहीच माहिती नसतं.. त्यांनी नोटीस लावली आहे ' यावेळी होळी नाही खेळायची सोसायटी मध्ये '....  का नाही खेळायची, त्याच्या बापाची सोसायटी आहे का? आम्ही फ्लॅट मालक आहोत,  वेळेवर मेंटेनन्स भरतोय, आम्हाला आमचे सण, उत्सव करायला कोणाची परवानगी कशाला पाहिजे? काय गं.. बरोबर ना.. असे म्हणत राहुल ने वैष्णवी ला इशारा केला, त्या पाटील ला धडा शिकवायलाच पाहिजे. सतत कायदा कायदा करतो.. गाडी पार्किंग वरून पण वाद घालतो. चल बघतो त्याला एकदाचा..
खाली पार्किंग लॉट मध्ये पाटील दिसतात..काय पाटील.. होळी रंग पंचमी का नाही खेळायची आम्ही.. आम्ही फ्लॅट ओनर आहोत.. मेंटेनन्स देतोय.. लाज वाटू द्या जरा.
मि. राहुल भाषा जरा सांभाळून वापरा.. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. कायद्यात राहून कमिटी निर्णय घेत असते मी एकटा नाही. हि सोसायटी आपले कुटुंबं असल्यासारखे काही निर्णय घ्यावे लागतात. जगात काय चालू आहे बातम्या बघताय ना.. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. आपल्या सोसायटीत लहान मुले, वृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.... ' निघ रे.. नको शहाणपणा शिकवू.. नको लोकांची काळजी करु लेका. आम्ही सगळे समर्थ आहेत. सोसायटीच्या पैशांवर डोळा ठेवणारे तुम्ही कसली काळजी करताय रे.. सोडा.. होळी एकत्र खेळण्याने, काही नाही होत.. असे बोलत राहुल हातात फोन काढून व्हिडियो शूटिंग करू लागला.
मि. राहुल होळी सण, उत्सव यांचे स्वरूप बघताय ना सध्या..  पाण्याचा गैरवापर होतोय.. धांगडधिंगाणा होतो हल्ली.. कोणा एका मुळे सोसायटीतील इतर लोकांच्या आरोग्याशी आपण नाही खेळू शकत... चल चल नको शहाणपणा शिकवू.. आम्हाला कायदा कळतो.. कळले का?  असे म्हणत राहुल वैष्णवी ला घेऊन तिथून निघून गेला.  हे असले कोणी केले चेअरमन आणि सेक्रेटरी.. मुद्दाम राग काढतात.. नेक्स्ट टाईम वैष्णवी तू बोलत जा अशा अर्धवट माणसांशी.. म्हणजे महिला असण्याचा फायदा घ्यायचा.. मग हे पोपट बोलणार नाहीत पुढे पुढे.. राहुल वैष्णवी ला गाडीची चावी देत म्हणाला. आता ' तू गाडी चालव' " अरे पण मला अजून कॉन्फिडन्ट नाही इतका..वैष्णवी घाम पुसत म्हणाली. '  सोड.. कॉन्फिडन्ट कोण बघतो हल्ली... कायदा महत्वाचा.. ट्राफिक पोलिसांनी अडवले की शिव्या घाल.. मग मी व्हिडियो बनवून सोशल मीडियावर शेअर करेन.. मग बरोबर यांची वाजेल.. काय बोलते.. हाहाहा.. ' राहुल काय सॉलिड डोकं लावतो तू..वैष्णवी हसत म्हणाली.. मग नवरा कोणाचा आहे असे म्हणत राहुल ने म्युझिक सिस्टीम लावत कार चा एसी ऑन केला.

काही दिवसानंतर..
( करोना मुळे लॉकडॉवून जाहीर झाले होते. बातम्यांवर बातम्या येऊन थडकत होत्या.. ) राहुलच्याच सोसायटी शेजारील सोसायटीत करोना पेशंट सापडले होते. बातम्या, सोशल मिडीया वर चे करोना पेशंट, जगातील इतर महासत्ताक देशांची अवस्था चे व्हिडियो पाहून राहुल आणि वैष्णवी खूप घाबरले होते. हे करोना विषाणू चे संकट कधी पसरले कळलेच नाही.
' घराबाहेर पडू नका"  चे मेसेज आता सोशल मीडियावरून राहुल सर्व सोसायटीतील घर मालकांना पाठवत होता,
' पोलिसांना सहकार्य करा म्हणून राहुल आणि वैष्णवी सोसायटी, शाळा, कॉलेज मधील मित्रांना सोशल मीडिया ग्रुप वरून मेसेजेस पाठवत होते. आपल्या घरापर्यंत हा वणवा पोहोचू नये यासाठी सर्व उपाययोजना तो आज वापरत होता. यावेळी किमान सोसायटी मध्ये एकता ऐक्य दाखविण्या साठी टाळी, थाळी, मेणबत्ती, दिवा त्याच्या मदतीला धावला होता. समाजाला दिखावा आणि इव्हेंट्स जास्त उद्बोधक वाटत होते, पाटील साहेबांच्या खिडकी कडे कटाक्ष टाकून तो पाहत होता, पाटील साहेबांना या देशप्रेमाच्या, ऐक्याच्या दिखाव्याची गरज न्हवती. त्यांनी हे प्रकार जाणीवपूर्वक टाळले होते. मग राहुल ने  पाटील साहेब देशद्रोही कसे?  अशी कुजबुज करायला त्याने घरापासूनच सुरुवात केली. आपल्या वैद्यकीय सेवा सुविधा यावर त्याला आता प्रश्न पडत न्हवते. राहुल समाजातल्या दांभिकतेचा आरसा होता या दिवसांमध्ये.  सोसायटी पाटील साहेबांसारख्या लोकांच्या हातात आहे हे त्याला मनात पटत होतं पण ओठावर येत न्हवतं. अहंकार वृत्ती समाजात फोफावली आहे याचे ते द्योतक होत.
लवकरच करोना चे संकट टळेल, पुन्हा राहुल सारख्या प्रवृत्ती समाज, सोसायटी,  झोपडपट्टीतील लोकं, त्यांची मनोवृत्ती, अशिक्षण, दारिद्र्य, विज्ञानवाद  यावर नाक मुरडताना दिसतील, पुन्हा संकट आले की प्रसंगी दिवे लावतील, टाळ्या, थाळ्या, ढोल ताशे, डिजे, मिरवणुका काढतील, सोशल मीडियावर हॅश टॅग लावतील पण समाजातल्या मिणमिणणाऱ्या जिवंत माणुसकीच्या दिव्यात प्रकाश वाढावा म्हणून प्रयत्न करतीलच हे कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून त्या सोसायटीतील पाटील साहेबांसारखी माणसं हि गदिमांच्या या गाण्यासारखी वाटतात मला  एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक... !

वैभव  जगताप
लेखक
www.postboxmedia.wordpress.com