postbox media

Showing posts with label नवस. Show all posts
Showing posts with label नवस. Show all posts

Friday 4 October 2019

नवस





२००१ मध्ये लिहलेली कथा...

" नवस "

‘पिरोबा’च्या देवीची येस वलांडली की म्हाडकाचा ‘मळा’ लागतो. ‘पिरोबा’च देवाळ तस खुप जुनं, पण जत्रंलाच आया ‘बाया’ नवसाची कोंबडी-कोंबडा कापाय तथं यायची, नायतर एव्हांना तिकडं कोण डुंकत सुद्धा नाय. माळावरच्या पिपंरनी मधी मधी गारवा द्यायला उभ्या हायत्या अशा वाटायच्या, तशा पाऊलवाट रुंद टेकाडवरन जाताना कुठं आंब्याच झाडं तर कुठं जांभळाची झाडं लागायची. ‘येतगाव’च्या जत्रेच्या निमित्तानं तिथं जायला व्हायचं ते बी ‘दाजी संग. त्याच येतगावच्या माळावर उसाच्या बांधाला धनगराची काय पाच-दहा घरं व्हंती. दाजी म्हणजी आमचा ‘म्हातारं’ म्हणजा आमचे ‘आजोबा’ समद्यासंग त्याचं चांगल व्हंत. श्येमा वडार, बापू वडार, नाम्या लव्हार, येश्या धनगुर अशी बरचशी मंडळी त्यांनी कामानिमित्त बांधून ठेवली व्हती.
येतगांवच्या जत्रेला येनी-देनी भागवायला दाजी यांच्या घराकडं तमाशा झाला की फिरकायचा.
त्यात बापू वडारच्या कोपच्या मणतलं पाणी इतकं गारगार असायच की‘ शहरातले’ फ्रिज फिके पडतील अशा उन्हाळ्यात, कडक उन्हात सुद्धा काव्या मडक्यातलं पाणी पिताना जीवाला खूप बरं वाटायच. ‘बापू वडूर’ अन् त्यांचा भाव लाल तिखाट चटणीला लय हावरे होते असं आम्हा बच्चे कंपनीला आजी कडनं माहित झालं व्हंत. तो दोन-दोन ‘बरण्या’ चटणी खायचा. आम्हाला लय गमजा वाटायची त्याची.
आजोबा दोन खांद्यावर घेऊन आम्हाला ‘तमाशा’ दावायचे. तिथनं पुढं आमी समदी या लोकांना भेटायचो. असच ‘येश्या’ धनगुराच्या घरी गेलो तवा त्याच्या शेजारच्या शिरपतीची ‘च्या’ पिती पिता त्यान सांगितलेली शिरपतींची गोष्ट आज देखील कुठं मेंढर दिसली, की ‘चहा’ प्यायला घेतला तरी झरकन डोळ्यापुढं उभी राहते. आता ‘नवस’ हा शब्द खूप कमी कनावर पडतो. पण जत्रा जवळ आल्या की ब-याचदा या शब्दाची आठवण येते आणि शिरपतीची ती गोष्ट न राहावून आठवायला लागते.
शिरपत आणि सईला त्याच्या लग्नानंतर मूल नव्हते. मेंढपाळीच्या व्यावसायामुळे त्या दोघानाही या गावांतून त्या गावामध्ये सतत स्थलांतर करावे लागे... आपल्या १०-१५ मेंढ्याच्या कळपामध्ये... एखाद दुसरी शेरडं पण व्हंती... म्हातारीचे आणि सईचे पटत नसल्यामुळे शिरपती तिच्यापासून दूरच रहायचा... दोघा नवरा-बायकोला मूल नव्हते. अनेक उपास-तापास करून झाले... भोळ्या-भाबड्या त्या दोघांच्या वाट्याला हीच काय ती शोकांतिका... फक्त गावच्या मुक्कामी दुपारच्या भाकरीच्या वेळेला आलेल्या कडक लक्ष्मीच्या माणसाला सईला दिलेला प्रसाद आणि सईने (केलेला) मागितलेला नवस यानंतर काही दिवसांनी मु.पो. चिखलीला असताना सईला दिवस जाऊन पुत्ररत्नाचा लाभ होतो... नवसाला देवी पावली, म्हणून मुलाचे नाव ‘देवी भैरवी’च्या नावावरून ‘भैरव’ ठेवते...
आज या मुक्कामी तर उद्या त्या मुक्कामी... मेंढी चरायला घेऊन जाणा-या शिरपतीला त्याच्या कळपाची उदरभरण आणि कुटुंबाची काळजी सतत असायची. आपल्या कळपातील प्रत्येक मेंढी आणि शेरडावर जिवापाड प्रेम करणा-या शिरपतीप्रमाणे हसण्यात १०-१५ वर्षांचा झाला होता. शाळेत जात होता. शिरपतीनेही आता मु.पो. चिखलीत आपला तळ ठोकला होता.
भैरवचे बालपण फार मजेत गेले... रानावनात आणि निसर्ग सानिध्यानात मेंढ्याच्या प्रेमात त्याचे बालपण गेले होते... कळपात नव्यानेच जन्म घेललेल्या लक्ष्मीच्या शेरडीला दोन पिल्लाचा लाभ होतो... भैरव आणि त्याचा कुटुंबाला आनंदाचा पारावर नाही राहिला... फक्त काळी आणि फक्त पांढरी रंगाची दोन पिल्ल यांच्या बरोबर दिवस खुप छान मज्जेत घालवताना कधी शाळेला जायला कंटाळा करणारा ‘भैरव’आयचा मार देखील आनंदाने खायचा... मग शिरपतीच्या मध्यस्थीने भैरव ‘सई’च्या तावडीतून सुटायचा... पिल्ल आता जराशी मोठी झाली होती. दोन्ही पिल्लांना भैरवचा चांगलाच लळा होता. तो दिसला की ती उड्या मारायची... रानावनात फिरायचा... दोस्तांबरोबर खेळायचा पण त्याचा जीव त्या दोन पिल्लांवर खूप असायचा...
इकडे शिरपती आणि सईदेखील संसारात खूश होते... शिरपतीनेही दुष्काळात आपल्या मेंढ्याच्या कळपाच्या उपजिवेकेसाठी गावातल्या सावकाराकडून कर्ज घेतले होते... त्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेडीची चिंता शिरपतीला सतत असायची... पण सई त्याला सतत आधारही द्यायची... चिखलीच्या मुक्कामी असताना शिरपतीने एका पडक्या घराचा देखील आपल्या संसारासाठी उपयोग केला होता. भटक्या आणि विमुक्त जातीसाठी सरकारी सवलती आणि योजनांचा शिरपतीसारख्या पोटापाण्यासाठी भटकंती करणा-या लोकांना काहीच मागोसा नसतो... शिरपतीने कर्ज घेतलेल्या सावकाराच्या ‘महिपतराव’ला देखील मूलबाळ होत नसते. अशावेळी मागल्या ‘पीरबाबाच्या’ जत्रेमध्ये त्याच्या बायकोने ‘चांगुणानं’ केलेल्या नवसामुळेच आपल्याला पुत्रप्राप्ती झाली यामुळे सावकारही खूश असतो. पण यंदाच्या जत्रेत आपण नवस फेडायचा असा त्याचा घाट असतो. केलेल्या नवसाप्रमाणे चांगुणा पांढ-या रंगाचे कोकरू बळी देईन असे म्हणाली असते... यंदाची जत्रा तोंडावर आली असताना सावकाराला चांगुणा याची आठवण करून देते... सावकारही ह्या जत्रेत तो नवस फेडण्यासाठी अशा कोकरूच्या शोधात असतो. पण त्याला फारसे काहीच यश येत नाही. शेवटी कामावरच्या गड्याच्या सांगण्यावरून त्याला शिरपतीकडे अशाप्रकारचेकोकरू आहे असे कळले... जत्रा तोंडावर आली असताना चांगुणा देखील महिपतरावाकडे यासाठी मागे लागते.
सावकार शिरपतीची भेट घेऊन त्याच्याकडे असलेल्या कोकरांसाठी मागणी करतो. पण शिरपती बळी साठी तयार नसतो. तो म्हणतो, “माझ्या कळपातील सगळे कुटुंबासारखे आहेत. लेकराचा आणि बायकोचा जीव देखील अगदी पोराबाळाप्रमाणे आहे.” तुम्हाला पाळायला हवं असलं तर देतो... पण बळी नको... सावकार खिन्न होऊन परततो... इकडे शिरपती आणि सई चिंतीत होतात... चांगुणा हट्ट करते... नवस काही झाल्या फेडायला हवा... तुमी काय बी करा पण नवस पूर्ण करा... दुस-या दिवशी सावकार पुन्हा शिरपतीकडे कोकराची मागणी करतो. कर्ज फेड किंवा कोकरू दे... कर्ज फेडणे अशक्य असते... भैरवलाही या गोष्टीचा पता नसतो. तो त्या कोकराबरोबर खेळताना बाप त्याला पाहतो... सावकाराकडेदोन दिवसाची मुदत घेऊन शिरपती निवांत होतो... दोघा नवरा बायकोला झोप येत नाही ते दोघं शेवटी कोकरू भैरवला न सांगताच द्यायला राजी होतात.
सावकार दुस-या दिवशी जत्रा असल्यामुळे कोकराला घेऊन जातो... जाताना सावकार शिरपतीला काही पैसे देतो... भैरवला जत्रेच्या दिवशी कोकरू कुठेच दिसत नाही... सई आणि शिरपती म्हणतात इथेच कुठेतरी असेल... असे म्हणून समजावतात... पण भैरव त्या कोकराला शोधायला निघतो... वाटेत ‘संपत’ नावाचा त्याचा मैतर भेटतो... तो सांगतो, ‘महिपतरावानं’ तुझ्या बाबाकडून कोकराला विकत घेताना त्यानी बघितलयं... तू वाचीव त्याला... आज महिपती दुपारच्या पारी त्याला पीरबाबाला बळी देणार हाय... भैरव तसाच पळत घरी जातो... रडवेल्या भैरवला दोघेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण भैरव ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. तो भांडून ते पैसे शिरपतीकडून काढून घेतो... आणि सावकाराला द्यायला पळत सुटतो... सावकारच्या घरी पोहोचतो तिथे त्याचा गडी सांगतो... महिपतराव बळी द्यायला टेकडीच्या पीरबाबाकडे गेलेत... म्हणून इकडे भैरव तडक धावत टेकडीच्या दिशेने जातो... भैरव धावतोय, हातात पैसे आहेत. महिपतराव आधीच टेकडीवर कोकराला बळी द्यायला सज्ज आहेत... त्याला पाणी पाजून देतात, सु-याला शेवटची धार होतेय... कोकराच्या गळ्यात माळा आहेत... भैरव धावत तिकडे पळतोय... गुलाल उधळला जातोय... आणि भैरव पोहोचणार इतक्यात सुरा कोकराच्या मानेवरून फिरतो... भैरवच्या हातातली पैशाची थैली पडते... भैरव स्तब्ध... थैलीतील काही नाणी घरंगळत पीरबाबाच्या दगडापर्यंत जातात... रक्ताचे चित्कारे त्या दगडावर देखील उडालेले असतात... भैरव तसाच रडत परत पळायला सुरुवात करतो... फक्त चढीच्या रस्त्यावर भैरव पळतोय... क्षितीज टेकलेल्या ठिकाणी भैरव हळुहळु दिसायला लागतो... रडवेल्या भैरवला त्या चढीच्या ठिकाणी दम लागतो, तो गुडघ्यावर हात ठेवून तसाच उभा राहतो... डोळ्यात कारुण्याचे भाव उमटले आहेत...



वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com