postbox media

Showing posts with label समाधी. Show all posts
Showing posts with label समाधी. Show all posts

Friday 4 October 2019

समाधी




समाधी

"दाजीला" आवाज देत हातातली काठी भीताडाच्या कडला ठेवून धुरपा म्हातारी वाड्याच्या खांबाचा आधार घेत आत येत एक एक पाऊल टाकायची, "दाजी" आसल का नसल तरी पण धुरपा कधी "दाजी" तर कवा "आणणा" अशी हाळी द्यायला इसरायची नाय. तस "धुरपा" म्हातारीच घर आमच्या घरापासन जवळ व्हत, तिच्या घराची एका बाजूची पांढर्‍या मातीची लिपलेली भिंत कोसळेली व्हती, घरावरची कौल्ल एखाद दुसर पूर्ण असल, बाकी सारी जमीनीवर "पारीजातकाच्या" सड्यासारखी पहुडलेली व्हती, पण गावाकडच्या "बाभुळ" किवा जंगली लाकडाच झाड असो, घराला वापरण्यात आलेल्या लाकडानी अजुन तरी दगा दिला नव्हता, घरा समोरच एक समाधी व्हती, मला त्या समाधीच फार कुतूहल वाटायच, मला त्याचच काय पण गावातल्या प्रत्येक समाधी बद्दल नेहमीच "कुतूहल" वाटायच, गावाकडची माती असो की दगड त्याला जो आकार द्याल तसा त्यो आकार घडत जातूया, कुणी त्या माती, दगडाला देवळासाठी वापरतात तर कुणी त्याला समाधी साठी वापरतात. धुरपा च्या घरासमोर असलेल्या समाधी वर माणसाच्या पाऊल खुणा कोरलेल्या व्हत्या, म्हंजी कारागीरा कडून कारीगीरी करून घडवल्या होत्या म्या पण ती समाधी कुणाची हाय हे इचारायच्या फन्द्यात कधी पडलो नाय. समाधी शेजारी असलेल्या भेंड्याच्या झाडाला धुरपाची शिरडी बांधलेली व्हती. तिची दोन पिल्ल मोकळ्यावानी तिथच आजु बाजूला बागडत मस्ती करत फिरायची, कधीकधी समाधी वर चढायची, त्या समाधीवरच इकड तिकड तिथच त्यांच्या लेंडया पडलेल्या असायच्या. खरतर या गरीब शेराडाशिवाय धुरपाला दुसर नात न्हवत, एक पोरग व्हत अस कुणाच्यातरी बोलन्यातन माझ्या कानावर आल व्हत, पण लग्नानंतर त्ये येगळ राहायला लागल, तस धुरपाकड बघायला कुणीच न्हवत, काठी टेकत जिवाला सांच्यापरी थोडा आराम मिळावा म्हणून धुरपा आमच्याकड यायची, मला धुरपाच आमच्या कड येन आवडत नसायचा, कारण ती काय जास्त बोलायची न्हाय, माझी आजी पण मला "आय" सारखी वाटायची पण धुरपा मला परकी आजीच वाटायची आन् धुरपा घरी यायच्या आधी आय आमची धुरपाची भीती घालून मला दूध पाजायची, "आय" म्हणायची दूध पी नायतर धुरपा इल, आन् त्या बोचक्यात घालून तुला घीऊन जाईल. मलाच काय पण आमा बच्चेकंपनीला धुरपाची भीती वाटायची. धुरपा यायची, नियतीला नाती कळत नसतात बहुतेक, म्हणून की काय सख्या पोटच्या पोरान "नातवंड" तिच्या जवळ ठेवली न्हवती, प्रेमपाय आमाला नातवंड समजून जवळ घ्यायचा प्रयत्न करायची. गावा कडची साधी भोळी माणस ती त्यानाच ठाऊक की प्रेम,माया, नाती काय असतात ती. हल्ली जेह्वा केह्वा मी गावी जातो मला कोणत्या तरी माणसाच्या जाण्याची, त्याच्या निधनाची बातमी कानावर पडते, तसा मायेचा आणखी एक झरा आटल्यासारखे वाटत राहते, तशी माझी पणजी भलतीच तुसाड व्हती कारण तिला धुरपा घरी आलेली कधी खपलीच नाय, ती तिला सारखी कोंबड्या कुतर्‍या वरुन टोचून बोलायची. धुरपा तिच्या घरातन निघताना समाधीकड एक नजर टाकत घरच्या रस्त्या कड चालत काठी टेकत यायची, आमच्या आयन एकदा मला सांगीतल की ती समाधी तिच्या धन्याची / कारभारयाची ची हाय, राहायला घर व्यवस्थित नाय, पण आपल्या धन्यासाठी तिन गाठीशी जोडलेला एक एक पैका खर्चून ती समाधी बांधली होती. पावसाळ्यात धुरपा घरी यायची, ती कोपरयातल्या सोफयात पहुडलेली असायची, तिच्याकड एक घोंगड असायच त्याच घोंगड्याला मी दर उन्हाळ्यच्या सुट्टीत गावी आलो की पहायचो. धुरपा पाठीच्या कण्याच्या आजाराने त्रस्त असल्यान चालताना नेहमी जराशी वाकुनच चालायची. काठीचा आधार तिला आयुष्यभरासाठी सोबतीला लागलेला व्हताच, पण तिच्या डोळ्यात मात्र असे कधीच दिसले नाही की तिला कशाचे तरी दुख बोचत असावे. मला ती सगळ्यांचीच आजी असल्यासारखी दिसायाची. धुरपा कड बघायला कुणीच न्हवत. काठी टेकत जिवाला सांच्या पर थोडा आराम मिळावा म्हणून धुरपा आमच्याकड यायची. प्रेमापाय आमालाच नातवंड समजून जवळ घ्यायची, पण मला त्यावेळी तिची माया कळली नाही. माझ्या आजीला धुरपा घरी आलेली खपायची नाय ती तिला सरळ जा म्हणू शकत नसल्याने तिला सारखी कोंबड्या कुत्र्या वरुन बोलायची. धुरपा पावसाळ्यताल्या दिवसामध्ये पाठीवरुन घोंगड किवा गोणपाट टाकून बाहेर पडायची.निघताना समाधीवर एक नजर टाकून बाहेर पडायची का कोण जाणे तिचा देवावर आता विश्वास राहिला नसावा बहुतेक. माझी आय मला म्हणाली होती की ती समाधी तिच्या नवर्‍याची हाय म्हणून, तेव्हा मला माहीत झाल. पण राहायला घर व्यवस्थित नसलेली धुरपा नवर्‍याच्या समाधी साठी गाठीला पै न पै जमा करून बांधून घेतली व्हती. तिच्याकड असणार्‍या घोंगड्याला मी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आलो की पहायचो, धुरपा इथच भाकरीच दोन घास खायची, आयुष्य कष्ट करण्यातच गेल व्हत, कालवन नसल तर ती चटणी –भाकर खाऊन दिस काढताना दिसायाची, धुरपाच्या अंगावर एक फाटक आन् एक बर्‍या पैकी "फाटक" अशी ती हिरव्या आन् मोर पिशी रंगाची लुगडी वापरत असायची. तीन वर्षापुरवी जवळच्या नात्यातल्या लग्नात आहेर मिळालेली लुगडी व्हती. धुरपाच्या काबाड कष्ट करून आणी वयाच्या मानाने आलेल्या चेहर्‍यावरच्या समाधानी रेषा आता जास्तच गडद आणी मोठ्या झाल्या व्हत्या. कसल सुख आणी कसल दुख: लपवनार ती, कारण सुख: म्हंजी काय त्ये त्या बिचारीला काय ठाऊकच न्हवत. डोळ्यांच्या कडा नेहमी पाण्यान भरलेल्या असायाच्या दर दिवसाल ते आसवांचे थेंब सुकल्यावर त्याचे वन मला चेहर्‍यावर दिसायचे. कपाळावर मेन लावल्या नंतर आयुष्यभर ज्याच्या नावाने लाल मळवट भरला व्हता, आज त्या जागेवर तिथ कुकू न्हवत तर गोंदल्याच्या खूना आणी त्याचा ठसा उमटलेला दिसायचा, आयुष्यभराची पायपीट आणी पायाना पडलेल्या भेगात विलक्षण सामर्थ्य असलेल जाणवायच, पण आता ते वयाच्या मानाने हरवलेल दिसल. या येळेला गावी आलो त्या वेळी हसन्या खेळण्यात माझ दिवस गेले. आन् पाणी भराया बोरजवळ जायच्या वेळी माझ सहज धुरपाच्या घराकड लक्ष गेल. धुरपाची "घोंगडी" भेंडीजवळच्या भीताडावर फाटून झीजलेली मला दिसली, भेंडी जवळची शेरड पण मला तिथ दिसत नव्हती. तिच्या लुगड्याच्या रंगाची फडकी घराजवळ पडलेली दिसत व्हती, घर होत तसच होत. कुणी आसल का नसल तरी त्या घराला कुलुप लावलेल कधीच नसायच,आताही ते न्हवत. घरात चेपलेली टोप, फुटलेली चूल, भिताडात असलेल तुटलेल्या लाकडाच कपाट माती पडून झाकल गेल व्हत. कदी नाय पण या येळला गावकडल्या लाकडान दगा दिला व्हता. घरच्या छपराच मधल लाकूड कना मोडल्यागत आत पडल व्हत. मी तसाच धावत घराकड वळलू तर तिथ धुरपा न्हवती, म्या सुदीक तिच्या भितीमुळ ती कुठ हाय हे कुणालाच इचारल नाय . पावसाळ्याचे दिस सुरू झाले, इजांचा कडकडाट सुरू व्हता, इजा चमकू लागल्या व्हत्या. पाऊस धो-धो कोसळू लागला व्हता, आमी समदी पोर सोफयात पडणार्‍या गारा येचायला बाहेर पडलू आन गारा मारत एकमेकांशी खेळू लागलू. माझ्या अंगाला गार जोरात लागल्यान म्या रडायला लागलू. मला रडताना बघून आय भाकरी चुलीजवळ थापत थापत मला आतूनच म्हणाली, गप बस की रे बोकाडा वर म्हातारी आभाळात दळतीया अं तुझ्या किरडीचा दान्डा निखाळलाय हूय र, म्या पटकन गप झालू, आन् वर आभाळात पाहील .... "म्हातारी दळतीया" ?? म्हंजी आमची धुरपा म्हातारी आभाळात बसून दळतीया, आज जेव्हा जेव्हा असा मोठा विजा चमकून पाउस येतो, अंगणात हलक्याच पांढर्‍या शुभ्र रंगाच्या गारा पडतात, हलक्याच सरींच्या पहिल्या पावसात मातीला गंध सुटतो तशी आपल्या नात्यातल्या आन् नात्या पेक्षा जवळच्या लोकांच्या आठवणींचा मनाला गंध सुटतो, नकळतच डोळे ओले होतात, प्रत्येकाच्या आयुष्यातला एक म्हातारा बाबा किंवा एक म्हातारी आजी पुन्हा हळूच मागून येईल आणी आपल्या गालावर हात फिरवत आपल्या हाताने, पदराने आपले डोळे पुसेल असे न रहावून वाटत राहते आणी कुठेतरी ओसाड माळराणावर कोसळलेली वीज क्षणात मनावर कोसळलेली भासुन रहाते, धाडकन डोळे जागे होतात, पुन्हा पावसाच्या बातम्या, टी.व्ही चॅनेल, रिमोट आणी मोबाईल याना आपली नात्यांची जागा देऊन पाउस थांबण्याची वाट बघत बसतो.




 वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com