postbox media

Thursday 6 February 2020

बेळगाव - पुणे व्हाया सातारा

बेळगाव - पुणे व्हाया सातारा

गणपतीला ऑफिस सुट्टी नसल्याने मुंबईला यावर्षी गणेशचतुर्थी ला जायला मिळेल कि नाही अशा मन:स्थितीत अडकलेलो असताना ,चार पाच दिवसाची सुट्टी मिळालीच शेवटी, बंगलोर वरून फिरत फिरत यावेळी देवदर्शन घेत मुंबईला जायचा बेत ठरवला, शक्यतो विमान प्रवास आणी व्होल्वो चा प्रवास देखील टाळला, कोंडुसकर व्होल्वो ने कोल्हापूर गाठले,आणी तिथून पुढे पन्हाळा जोतीबा असे दर्शन घेवून कोल्हापुरात एस्टी डेपो तून मुंबईला जाणारया गाडीची वाट पाहत उभा होतो,पण 'नियमीत वेळा' हे शब्द हे  फक्त या पाट्यांवर असतात,त्यामुळे अनियमित वेळेत येणारी गाडी देखील माझ्या नशिबी न्हवतीच, इतक्यात बेळगाव वरून सुटलेली 'बेळगाव-पुणे' असा कानडी चा फलक असलेली गाडी कोल्हापुरात रिकामी झाली, पुढे याच गाडीने पुणे गाठून पुढचा मुंबई प्रवास करावा असे ठरवून मी विन्डो सीट पकडली,गाडीत तशी गर्दी फारशी न्हवती पण विन्डो सीटचा मोह यापुढे सारे विसरवून गेलो होतो, कानातील हेडफोन बाजूला करून खिडकी उघडण्याचा मी प्रयत्न केला, दोन सीटला एक खिडकी अशी रचना असल्याने मी ती अर्धीच उघडून ठेवली,जरा नजर वळे पर्यंत खिडकी पुन्हा बंद झाली,हवेने बंद झाली असेल म्हणून मी पुन्हा उघडून बसलो,पुन्हा तेच खिडकी पुन्हा बंद.तीन चार वेळा असे झाल्याने मला माझ्या मागील सीट वर बसलेल्या प्रवाशाचा राग आला,आणि मी त्यावर ओरडायला मागे वळणार तर पाहतो तर काय तीन सुंदर मुली एकाच सीटवर,तसा माझा राग पटकन शांत झाला,विंडो सीटवर बसलेली तरुणी हलक्या आवाजात म्हणाली "अय्या..मीच उघडतेय खिडकी.." अस का..असू द्या..असू द्या..असे म्हणत मी स्त्रीदाक्षिण्याची प्रचीती देण्याचा प्रयत्न केला आणी सभोवताली नजर गेली तर पाहतो तर काय..मागील अर्ध्यापेक्षा जास्त सीटवर कॉलेज तरुणीचा घोळका..हे म्हणजे एका जाहिरातीमध्ये "बेटा मन मे लड्डू फुटा..अस काहीसं वाटून गेलं..फर्गुसन कॉलेज मधील या सुंदर मुली आणी त्यांच्या सोबतीला दोन त्यांच्या प्राध्यापिका..बेळगाव ला कलावती देवीच्या आश्रमात आठवड्याच्या शिबिराला दरवर्षी जातात,ते आता तिथूनच पुण्याला परतत आहोत अशी महत्वाची बातमी त्यांच्या मॅडमकडुन मिळाली,बातमी कशी काढायची याचे फारसे कौशल्य लावायची मला गरज वाटत नाही..पुढे थोड्या वेळाने मला थोडी खिडकी त्या सुदंर तरुणीने उघडी करून दिली, पुन्हा आभार मानण्याची संधी घालवण्या इतका बावळट तर मी नक्कीच न्हवतो, उत्तरादाखल मिळालेले 'हास्य' मी पुरता तीन ताड उडालो,सीट घट्ट पकडून ठेवली होती म्हणून बरे..मी उगाच पुण्यात नवखा असून स्वारगेट स्टेशन आले की मला सांगा असे मुद्दामच बोलून ठेवले,कारण त्या सर्व स्वारगेट ला उतरणार होत्या हे आधीच ऐकले होते मी.. जरा खिडकीच्या काचेच्या परावर्तनात मी तिला पाहण्याचा प्रयत्न केला, गोड गोजिरी,फारसे कुरळे नाही पण लांब सडक केस,गालावर स्पर्श करणारी बट, हसल्यावर गालावर पडणारी खळी,पाणीदार डोळे..मी तीला चोरून पाहतोय हे तीच्या लक्षात आल्यवर तीने पापण्यांची पिट पिट करत मैत्रिणीशी काहीशी कुजबुज केली..आणी तिघी हसत्या झाल्या..पुढे गाडीचा वेग वाढता झाला तसा या सर्व मुलीनी अंताक्षरी ला सुरवात केली..सुरवातीला मला वाटले मराठी गाण्याची अंताक्षरी असावी कारण राधेच्या भजनाने सुरवात करून सर्व देवादिकांच्या भजनाच्या गाण्यांनी दोन ग्रुप मध्ये शेवटच्या शब्दावरून त्या त्या देवांच्या भजनाची गाणी अतिशय सुरेख आवाजात त्या सर्व गात होत्या,मला खूप आश्चर्य वाटले,कोल्हापूर पासून सातारा आणी पुढे पुणे हे अंतर बरेच होते,पण न थांबता सर्व देवांच्या भजनांना ऐकून मी दंग झालो.हा अनुभव मला नवीन आणी विलक्षण असाच होता.मुलींवरचे संस्कार आज अशा दिवसामध्ये पाहणे याची देहा याची डोळा मला पाहायला मिळाले,शहरातल्या मुलीची किव येवून न जाणे हे असेच काहीसे वाटत होते.कानातील हेडफोन  तसेच गुंडाळून ठेवून दिले आणी मीसुद्धा भजनांच्या सुरात तल्लीन झालो..पुढे पुणे आल्यावर भजनाला पूर्णविराम मिळाला, हा नवीन अनुभव बरच काही शिकवून देखील गेला.पण स्वारगेट स्टेशन आल्यावर मला स्टेशन आल्याची जाणीव करून दयायला ती विसरली नाही,.."अय्या..स्वारगेट आले की.." मी फक्त तिच्या डोळ्यांमध्ये पाहता झालो,आणी तीने पुन्हा नुसतीच पापण्यांची पिट पीट केली..या गोष्टी ला एक वर्ष सरून गेले पण आजही 'ती' गोष्ट माझ्या स्मरणात राहून होती. या वर्षी पुन्हा गणपतीला पुण्याला जायचा बेत झाला.काकांच्या गाडीने मी आणी काका दोघेच प्रवास करत पुण्याला गणपतीसाठी पोहचलो,काकांच्या नेहमीच्या हॉटेल वर राहण्या ऐवजी मी काकांना आपण गौरीश हॉटेल ला राहूया असा सल्ला देवून झालो,काकांनी सुद्धा तो मान्य केला.गौरीश हॉटेल मध्ये राहण्याचा माझा हेतू काकांना पुरता कळलाच न्हवता..गाडीत तिच्या बोलण्यात 'गौरीश' हॉटेल शेजारी ते राहतात याचा उल्लेख आला होता..आणी यावेळी अशी कोणतीही संधी दवडायची नाही हे मनाशी पक्के ठरवूनच मी  पुण्यात पावूल टाकले होते..
.................

वैभव जगताप