postbox media

Showing posts with label #nhava #nhava sheva #uran #ulwe #sea link #sea #bridge #navi mumbai #nhava #shivdi nhava sheva #mumbai. Show all posts
Showing posts with label #nhava #nhava sheva #uran #ulwe #sea link #sea #bridge #navi mumbai #nhava #shivdi nhava sheva #mumbai. Show all posts

Saturday 15 August 2020

शिवडी - न्हावा सी लिंक

शिवडी - न्हावा सी लिंक आणि न्हावाचे प्रश्न आणि विकास

भारतातील महत्त्वाकांक्षी ट्रान्स हार्बर लिंक या  सर्वात मोठ्या लांबीच्या पुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पहिल्या गाळ्याच्या उभारणीचे  उद्घाटन केले, मुंबई पारबंदर प्रकल्प / मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता यावे यासाठी शिवडी न्हावा सी लिंक आणि त्याबरोबर वरळी ते शिवडी असा उन्नत मार्ग याच प्रकल्पातंर्गत हाती घेण्यात आला आहे. शिवडी,वरळी  हे मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत असल्याने तिथल्या स्थानिक प्रश्नांना योग्य पद्धतीने सोडविण्यात आले असल्यामुळे मुंबई सोबत नवी मुंबई आणि विमानतळ परिसराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत.
    दुसऱ्या बाजूला शिवडीमधून जाणारा हा सी लिंक नवी मुंबईच्या ज्या भागात उतरत आहे, तेथे सिडकोच्या माध्यमातून रस्ते, रेल्वे, नागरिक संकुल आणि वाढते नागरीकरण या भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे. मूळ रहिवाशी भाग असलेल्या शिवाजी नगर, न्हावा खाडी, मधला पाडा, न्हावा गाव, उलवे , कोपर, मोरावे, बामणडोंगरी इथल्या स्थानिक आणि प्रकल्पग्रस्ताच्या समस्या सोडविण्याचा वेग सरकारला वाढवावा लागणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्ताच्या रोजगाराच्या प्रश्नांसोबत, आगरी कोळी बांधवांच्या सागरी, मासेमारीच्या, जगण्यासाठी  पिण्याच्या पाण्याची समस्या इथल्या स्थानिक रहिवाश्याना मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. गाव देवी जत्रेसाठी  प्रसिद्ध असलेल्या " न्हावा " गावच्या समस्या ऐकल्यावर समुद्राजवळचा दुष्काळी भाग असल्यासारखे वाटते. कधी कधी महिना महिना या गावात पाण्याचा पुरवठा होत नाही, रहिवाशी अनेक वेळा मैलो मैलो पायपीट करून पाण्यासाठी वणवण करत असतात. स्थानिक लोकसेवक, नगरसेवक आणि समाज प्रतिनिधी या प्रश्नांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करतात आणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतात.पण कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा असे न्हावातील रहिवाश्यांचे सार्वत्रिक मागणे आहे. स्थानिक समाजसेवक रवीशेठ पाटील या भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजोपयोगी काम करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात.

मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली होती. राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प सुरुवातीला बासनातच राहिला. २०१२ साली काँग्रेस सरकारच्या काळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाना हिरवा कंदील दिला गेला, त्यावेळी  केंद्रीय पर्यावरण  मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भिती पर्यावरणवाद्यांकडून  केली जात होती, पण वनीकरणाच्या उपाययोजनांमुळे हा प्रश्न सुद्धा निकालात निघाला. मुंबई ते नवी मुंबई, जेएनपीटी, मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यातून दक्षिणेकडे जलदगतीने जाण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जोमाने सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे फायदे २२ किमीचा सागरी मार्ग, एकूण सहा मार्गिका, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणी, नवी मुंबई विमानतळाला जोडणी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडणी, रेवस बंदराला जोडणी, मुंबई-पनवेल अंतर १५ किमी.ने कमी होईल, नवी मुंबई, द्रोणागिरी, उलवे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला हातभार,१३० हेक्टरवर उभारणार प्रकल्प, ८८ हेक्टर जागा सिडकोची, तर २७.२ हेक्टर मुंबई पोर्ट ट्रस्टची, उर्वरित जागा खासगी मालकीची असणार आहे. मुंबईच्या दक्षिण भागातील शिवडीपासून न्हावा शेवापर्यंत जाणाऱ्या २२ कि.मी. लांबीच्या या पुलामुळे मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होणार आहे. सध्या मुंबईतून रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी कमाल अडीच तास लागतात. ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ तासाभरात हे अंतर कापता येईल.
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (एमटीएचएल)  ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली झाल्यावर या मार्गिकेवर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सांगण्यात आले आहे. यामुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये थेट २० ते २५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर आर्थिक निर्बंध आणि आणीबाणी बरोबर आर्थिक आणि कामगार कपात सारखे प्रश्न अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाला अडसर नको निर्माण व्हावेत. कारण  इथल्या स्थानिक लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक , सामाजिक प्रगती यासाठी असे प्रकल्प अत्यावश्यक आहेत.

लेखक
वैभव जगताप
www.postboxindia.com