postbox media

Friday 4 October 2019

अंगार






अंगार !! 


सांगली जिल्ह्यातील विटा शहरगाव, सतत गजबजलेले नसले तरी सोमवारच्या बाजाराला मंडईत पाय ठेवायला जागा नसते इतकी आग्ग बाई अरेच्चा गर्दी असते, विट्यापासून जवळच असलेल्या एका छोट्यश्या खेडेगावची ही कथा.

विट्याला जाणार्‍या एस.टी ची वाट बघत सनज्या पिपळाच्या झाडाखाली पारावर बसला व्हता. ऐन तारुण्यात चांगली पोरगी बघून आय बापान लगीन लावून दिल व्हत, लगीन झाल साकर कारकान्यावर कामाला जाताना रोज आयला जातू बोलणारा गडी आता बायकूला हासत हासत बाय बाय करायला लागला व्हता. दिस बघता बघता सरत गेले, चुलीजवळ फुकरन घेऊन बसणारी म्हातारी आय चुलीतल्या धुरातून येणार्‍या पांढर्‍या धुरा सारखी केसां न भी पांढरी झाली आता चूल गेली रॉकेलवर चालणारी बत्ती उजेडासाठी आणी स्टोव सयपाक करायला म्हातार्याने घरी आणून दिला व्हता, ऐतवारच्या बाजाराला तूर इकली त्या पैशात हे सामान आल, सून बाय पांढर्‍या बत्तीच्या उजेडात भाकरया भाजीत भाजीत गालातल्या गालात हासीत व्हती, संजया ला वाटल ही त्याच्यावरच हासतीया तसा त्यो जाम भडकला, हातात आलेल पायतान त्यान तिच्यावर भिरकावल तिच्या पायातल्या जोडव्यावर लागल्याने तीने तुम्हासनी काय कळत का नाय अस म्हणत स्वताच्या पोटावर हात फिरवत म्हणाली" बाळाला लागल आसत म्हंजी ?? घरात बत्ती पेटली व्हती पण संजया च्या डोसक्यात काय अजुन पेटत नव्हती, आय न रांजापाशी चुळ भरली आणी हातातल्या कागदावर शिल्लक राहीलेली मशेरी परचुंडी करत दाराच्या वरच्या दिवळीत कोंबून ठेवली, त्या दिवळीत ती स्वताच्या केसांचा पुंजका पण केसाळवाल्याला देऊन सुया, बीब, टाचण्या, रीबीन, क्लिपा घ्यायला ठेवत असायची. आयन कमरवर हात ठेवीत एक बोट तोंडात दातावर घाशीत संजया ला इशारा केला, इकड य" . परत पायतान फेकून मारलस पोरीला तर कंबारट मोडीन, पोटुशी हाय ती, बाप व्हनार हायीस तर जरा पोकात पणा येऊ दी की, संजया न नुसती मान डोलावली अन् खाली मान घालत बायको सुमीच्या तोंडाकड बघत हसत राहीला सुमीन रागान तोंड फिरवून नाराजी दर्शिवीली. बायको सुमीच्या तोंडाकड बघत हसत राहीला सुमीन रागान तोंड फिरवून नाराजी दर्शिवीली. म्हातारीन बुरनुस अन् एका बाजूला घोंगडी आन्थरली सून टोप उचलून आणतेय बघून म्हातारी रागन संजया कड बघू लागल्या वर संजया चाटदिशी उठला आन् सुमीच्या हातातला टोप घेत तू बस म्या आनतु सगळ बाहीर, अस म्हणत भाकरीच टोपल अन् रांजनातल्या पाण्याची तौली भरून घेऊन आला. आता त्याला भी गालातल्या गालात हसू येत व्हत पण संस्कारात आन् सासुरवासात वाढलेल्या पोरीनी अजुन तरी नवर्‍यावर चपपल कधी फेकल्याची ऐकीवात नाही. जेवण झाल्यावर सासूने भांडी घासली तर सुनेने लोटून काढण्याआधी संजयाने बुरनुस आणी घोंगडी घड्या घालून ठेवली, संजया पाठीमाग हातात हात घालून वर आकाशात पडलेल चांदण पहात पिपरणीच्या शेजारी येरझार्‍या मारू लागला. हातातली तंबाखुची पुडी काढून तंबाखू वर चुना मळू लागला. इकड आयन सुमीच्या डोस्क्याला तेल लावायला घेतल व्हत. संजया ला आकाशात चांदण बघताना बघून दोघी सासू सुना गालातल्या गालात हसायला लागल्या. म्हातार परगावाला लग्नाला गेल्याल ते काय पाव्हन्याकड असल्यान दहा चार दिस तर तिकडच असत. रात्र झाली काळोख झाला आता सगळी एकदम शांत झोपी गेली व्हती. आन् इतक्यात..

....क्रमश:





वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com


मास्तरांचे विद्यापीठ



मास्तरांचे विद्यापीठ ! 

'मौजे आंबेगाव' सांगली जिल्हा, 'कडेगांव' तालुक्यातील संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव. गावाच्या ग्रामपंचायती कार्यालया बाहेर नोटीस बोर्डावर जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की सगळ्या शाळेच्या मास्तरांची 'कडेगांव' तालुका वारी पक्की ठरलेली असायची, बाजाराच्या दिवशीच तालुक्याला जाणारे समदे यावेळी तासाला तालुक्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, पक्ष कार्यालयात, बाजारात, पाराच्या झाडाखाली नाहीतर 'सरकारी देशी दुकानात' हजर असायचे निवडणुक प्रचार, पोलिंग बूथ असो की मतमोजणी समद्या कामाला हे जुपले जायचे, तालुकाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,आमदार,खासदार,पक्षनेते, अपक्ष नेते समद्याना यांचा मुजरा व्हायचा. गाड्या भरुन भरुन नोटा तालुक्यावरुन गावागावात पोहचायच्या. वर्षभर अन्ना वाचुन दुष्काळ भोगलेले रात्री कोंबड्या, मटणावर तुटून पडायचे. नेत्यांच्या ,सरपंचाच्या वाड्यावर न अन मळ्यात रात्री फक्कड लावणी जमायची, पैसा उधळला जायचा. मास्तरांचे घोळके बीयर च्या बीयर बाटल्या रेचवायला दंग व्हायचे, इतिहासाचे 'मोहीते मास्तर' तोंडात चना,चिवड्याचा चकना टाकत दारुचा इतिहास सांगुन जायचे तर, भुगोलाचे पिसाळ सर तोंडातील तंबाखू बाजुलाच थुंकत..'मदीरेची उत्पत्ती,कालखंड सांगणार इतक्यात त्याना मद्य उत्पादन फायद्या- तोट्यावर गणिताचे 'जावळे' सर दोन पेग आधीच रेचवून ग्लास पुढे करायचे, तोच इंग्रजीच्या साने मास्तरानी देशीवर टिका करत नाक मुरडत इंपोर्टेड 'रोझ वाइन' चकचकीत ग्लासात घेत तुछ कटाक्ष टाकून... तुम्ही सगळे कसे अजुन मागास आहात... 'यु आर नॉट जंटलमन कलीग्स,.....यु पीपल नॉट ड्रिंकिंग इंग्लीश...असे तसे काही बाही बरळत बरळत शेवटी स्कॉचss शब्द बाहेर आला आणी हे महाशय नुसत्या वाइन मध्येच आडवे झाले. साने मास्तरांचा मुलगा अमेरीकेत उच्च शिक्षण घेतोय, आपल्या 'डॅड' साठी मधुन मधुन भारतात आला की आणतो एखादी काळी निळी वाइन ची बाटली. इतक्यात कोणाच्या तरी तोंडात 'तकीला पाहीजे होता रे श्याss असा उल्लेख आला पण ते काय असते हे माहीत नसल्याने मराठीच्या 'जोशी' सरानी तोंडातल्या तोंडातच माघार घेतली. तमाशा साहीत्य संस्कुती बद्दल भरभरुन बोलता बोलता तिथल्या तमासगीरीच्या पायातल्या घुंगरांवरुन बोटे फिरवत गळ्यात हात घालणार..इतक्यात 'अय काय बोलयचय ना ते लांबन..पायतान काढाय लावू नका' तमासगीर बाई भडकलेल्या बघुन संस्कृतचे कुलकर्णी मास्तर लगेच 'अरे बापरे हीss हीss ( असे खोटेच हसत) सॉरी हा...वेरी सॉरी..मला काय ती जोश्यांची 'शंकुतलाच वाटली' हाहा असे म्हणत.. 'जोशी मास्तराना डोळा मारत' जरा आलोच हाss डोळ्यावर पाणी मारून' असे म्हणत आत जे गेले ते बैठकीला परत न येता, व्हराड्यातच बसुन 'विस्कीचा विथ सोडा... लार्ज ग्लास' आस्वाद घेवू लागले. सगळा तमाशा चालु होता' ..आताची शिक्षण पद्धती कशी चुकीची आहे.. इथपासुन ते 'मंत्रीमडळात आणी निवडणूकीत 'शिक्षकाना जास्तीत जास्त आरक्षण मिळाले पाहीजे आणी... 'एक शिक्षकच देशाचा पंतप्रधान झाला तरच तो हा देश आपण 'तारु' इतक्यात ...'दारु....कोणीतरी मध्येच बोलले.. झिंगलेले भुगोलाचे 'कांबळे मास्तर' आता डुलायला लागले होते. सगळा प्रकार डोळ्यानी शांत पणे पाहून साधे सरळ दिसणारे सायन्स शिकवणारे निवृत्त 'यशवंत कदम' मास्तर या तरुण शिक्षकांच्या व्यवहारावर काहीच बोलत न्हवते. काळ बदलला आहे, "राजकारणच 'शिक्षण' आणी शिक्षणाचेच ' राजकारण' झालेय हे त्याना माहीत होते की काय त्यानी हातातली काठी सावरली, डोक्यावरची गांधी टोपी घालायला आता शाळेच्या पोराना बी लाज वाटते, पण कदम मास्तरांना स्वता:ची गांधी टोपी सावरताना, आणी विसरताना कधीच पाहीले न्हवते. हातातली काठी, चेहऱ्यावर लख्ख तेज, करारी बाण्याचे आणी सरळ स्वभावाचे असे उच्च बुद्धीवादी विचारांचे' ते या व्यवस्थे विरुद्ध लढण्याच्या भानगडीत कधीच पडले नाहीत. आता मास्तरांचे वय झाले होते, 'आवाजातल्या हरकती आणी डोळ्यात दाटलेले पाणी, शरीरावरच्या स्पष्ट दिसणाऱ्या सुरकुत्या आता आणखी स्पष्ट दिसत होत्या, झिजलेल्या चपला आता 'करss करss' असा आवाज करत न्हवत्या.शाळेत वर्गात मास्तर येतायत हे शाळेच्या तासाच्या घंटे पेक्षा मास्तरांच्या चपलांच्या आवाजानेच आधी समद्या वर्गाला कळायचे. आज मास्तरांची दोन्ही पोर सैन्यात मोठ्या हुद्द्यावर देशाची सेवा करतायत...ऱोज सात किलोमीटर सायकल तर कधी चालत शाळेचा बिकट प्रवास आणी नोकरी करणारा मास्तर...."झिंगुन आडवे झालेल्या एक एका शिक्षकाच्या 'प्रेताला' त्यांच्या घरी व्यवस्थीत पोहचवायची जवाबदारीचा 'आदेश' सर आंखोपर ठेवून पुढची पिढी सुरक्षीत करत होता. डोळ्यात पाणी दाटुन आले...'गुरुदक्षिणा' शब्द मराठी साहित्य विश्वशब्द कोशातुन कुठे हरवू नये याची भिती वाटु लागली होती आता मला..



वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

मऱ्हाठी देशा / मराठी द्वेशा / मराठा दशा





मऱ्हाठी देशा / मराठी द्वेशा / मराठा दशा 



 


'शिवाजी पार्क ते गोरेगांव' बेस्ट बस प्रवास. पावसाळा सुरुच, नेहमीचेच त्रासदायक खड्डे, खिडकीतून बाहेर डोकवताना टिपटिपणारे पाणी सहज तळहातावर झेलत प्रवास सुरु होता, पुन्हा पुन्हा टपोऱ्या थेंबांकडे कुतुहलाने पहायचो, 'आस्वाद हॉटेल' च्या पुढे बस थांब्यावर बस थांबली, एक दोघे प्रवासी उतरले आणी चार पाच स्त्री पुरुष प्रवासी बस मध्ये चढले. बस चालक आणी बस वाहक नेहमीच्या शैलीत एकमेकांशी घंटीने संवाद साधत आणी हाताने सुद्धा इशारा करत होते. बस वाहक माझ्या शेजारी बसलेल्या इसमाकडे गेला. आस्वाद बस थांब्याच्या पुढे बसमध्ये चढलेले ते सर्व मराठी भाषिक प्रवासी होते. त्यामुळे बस वाहक छप्पन इंची छाती फुगवत मराठी चा स्वाभीमान ठासून पुरेपुर कोल्हापूर भरला होता. समोरचा प्रवासी मराठी असूनही वाहकाशी हिंदीत संवाद करत म्हणाला, ' दो बॅंड्रा देना' , वाहकाला कदाचीत ही गोष्ट आवडली नसावी, त्याने मराठीतच त्याला सात रुपये सुट्टे द्या असे सांगीतले. "छुट्टा नही हे" समोरुन खिशात नुसताच हात फिरवत उत्तर आले. पुढच्या वेळेपासून सुट्टे ठेवत जावा. असे म्हणत वाहकाने मराठीत त्याला हटकून बोलून दाखवले. वाहकाने त्याच्या हिंदीला दाबल्याचा आनंद मला झाला. काय त्याचा तो मराठीचा आग्रह, त्याचा मऱ्हाठी बाणा आणी तोरा, सरकारी नोकरीत महाराष्ट्राची शान ठेवली गड्याने असे मनात म्हणत मी त्याच्या बद्दल आदर वाढवून बसलो. मनात त्याच्यामुळे मराठी चा स्वाभीमान वाढला असल्यामुळे मी देखील छाती काढून बसलो. शेजाऱ्यांला फारसा फरक पडल न्हवता असे दिसत होते. त्याने शेजारच्या बाकावर बसलेल्या त्याच्या कॉंव्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या हातात मोबाइल देत सांगीतले ' प्लिझ कीप इन युअर पॉकेट बेटा' मी थोडा हळूच वाकून त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण जाड जाड भिंगांच्या चष्म्यामुळे हा चष्मा आहे की बस प्रवासात सुद्धा हेल्मेट सक्ती केलीय की काय असे वाटून राहायची वेळ आली. पुढे प्रत्येक घंटी ला बस थांबत होती आणी प्रवासी चढत आणी उतरत होते. पुढे वांद्रे स्टेशन आले आणी माझ्य शेजारील इसमाचा बॅंड्रा चा स्टॉप आला आणी तो उतरला. पाच दहा बांधकाम क्षेत्रातील भैय्या गॅंग बस मध्ये चढली आणी माझ्या पाठीमागील जागेवर एकत्र बसण्यासाठी सरसावली त्यातील एक भैय्या माझ्या बाजुला बसला होता. बस वाहक त्या सर्वांकडे बघून हलक्या आवाजात म्हणाला ' किधर जाना हे दादा' खाडकन कोणी कानाखाली मारावी तसे वाटले. मराठीचे शब्द आता हिंदीची भाषा घेवू लागले होते. त्या वाहकाचा स्वाभीमान तळ्यात मासे पकडताना गळाला लागतो तसा लागला होता. वाहकाने शेजाऱ्याचे तिकीट काढताना ' छुट्टा हे क्या ' असे विचारले समोरून नही हे. असे म्हणत तो इसम त्या वाहकाला किम्मत न देता' ' ए फुलन का तोसे मुकादम का कहील बा..' असे काहीतरी पुटपुटत मागे जोरजोरात बोलु लागला. हतबल बस वाहक त्याना सुट्टे पैसे देत पुढच्या थांब्यासाठी घंटी जोरात वाजविता झाला. मला तो मुंबईच्या सामन्य मराठी माणसाचा प्रतिनिधी वाटला. मराठी ची गळचेपी झालीये, होते आहे पण कोणाला त्याचे सोयरे सुतक नाही. न राहावून बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या, साहेब इंग्रजी शब्द असून मराठी शब्दकोशातील मराठी शब्द वाटायला लावणारे सैनिक आठवले, मराठीच्या अस्मितेवर लढणारी शिवसेना वाढताना आमच्या डोळ्यांनी पाहीली, छत्रपतींच्या नावाने मतांची भिक मागणारा औरंगी विचारांचा भाजपा समोर नागडा नाचताना समृद्ध होताना पाहतोय. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराच्या बसची धुरा भाजपा चालक म्हणून तर शिवसेना वाहक म्हणून करत आहे. सेना वेळो वेळी धोक्याची घंटी देत आहे पण सेनेच्या घंटीला भाजपा घंटा महत्व देत नाही,पण चालक सत्तेच्या नशेत गाडी हाकतोय. परीणाम काय ते जनतेला माहीत आहे. 


 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

'भारत गिते' याची राज ठाकरे यांच्या घरासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी कानावर आली, रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधील कला शिक्षक आणी आमचा शाळेतील सहकारी, बालमित्र... त्यानंतर अनेक दिवसांची शिक्षण क्षेत्राबद्दल लिहायची इछा होती, पुन्हा सर्व गोष्टी डोळ्या समोर हळू हळू सरकू लागल्या, शिक्षण क्षेत्रातील बाजार एका लेखात मांडता येणार नाही पण या विषयाला न्याय मिळवून तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न जरुर करतोय.
मध्यमवर्गीय कामगार, मुस्लिम बहुल वस्तीतील वस्तीतली 'संत द्न्यानेश्वर विद्यालय' ही शाळा, आणी त्या शाळेची प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल १००% लागावा ही प्रतिष्ठा म्हणा किंवा परंपरा, ती प्रत्येक वर्षी राखली जावी यासाठी संस्था आणी शिक्षक वर्ग यांची मुर्दाड दंडेलशाही, इयत्ता दहावीला विध्यार्थी पोहोचे पर्यंत त्याची कल्पनाशक्ती, सामाजिक जाणिवा, इतर क्षेत्रातील त्याच्या आवडी निवडी, क्रिडा, शास्त्रीय समाजशास्त्रीय आवड, नागरीक शास्त्र आणी इतिहास भुगोल यातुन त्याचा बदलणारा दृष्टीकोण याचा कसलाही सारासार विचार न करता, हे सर्व विषय डावलून फक्त सर्व च्या सर्व विध्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेत कसेही उत्तीर्ण होतील यावर भर देताना त्या मुलाना मारुन धोपटून त्याला शिक्षण क्षेत्राची अनास्था वाटेल अशी कृत्ये घडवली जात होती. कदाचित त्यांचा हेतू विद्यार्थी घडविण्यापेक्षा परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याकडे जास्त असावा आणी तो त्यावेळी त्याकाळी विद्यार्थी वर्तनानुसार योग्य ही असू शकतो पण आता काहीसे चित्र बदलले असेल म्हणुन त्या त्या शिक्षकांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला, ज्या शिक्षकानी असे प्रकार केले त्यातील अनेकानी आपल्या पाल्याबरोबर परदेशवारी केल्यानंतर खंत व्यक्त केली, गणिताचे शिक्षक ज्यानी अनेक पिढ्याना गणिते, भूमिती, प्रमेये शिकविली ते त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते, अमेरिकेत आयटी क्षेत्रात आहे माझा मुलगा पण वेळ नाही मिळत. आम्हाला नासात फिरायला घेवून गेला होता. वेळ नाही, सतत टेंशन, डोक्यावरचे केस पिकून पांढरा कापूस झाला आहे. मी विचारले सर शाळा कशी आहे ? काय विचारू नकोस आता सेमी इंग्लिश झालीये शाळा, "आपटे" बाई गेल्या नंतर श्री. अब्दुल रझाक खत्री आणी संस्थेच्या चेअरमन डॉ. अमिता सुर्वे यांच्या सारख्या शिक्षण क्षेत्रासाठी आणी गरीब विद्यार्थी यांच्या विषयी आस्था, समाज भान जपणारी व्यक्ती शाळेची धुरा आता योग्य रितीने सांभाळताना बघुन आताच्या शिक्षकांबरोबर विद्यार्थी, पालकवर्ग देखील समाधानी झाला आहे, तरीही मराठी शाळा म्हण्टले की आताच्या पालकाना अनास्था वाटू लागली आहे किंवा जागतीक स्पर्धेत आपला पाल्य मागे राहील ही भिती वाटू लागली आहे,मराठी शाळा बंद होण्याची अशी अनेक कारणे असू शकतात, बेस्ट वसाहती मध्ये फिरून मुलाना शाळेत यायला सांगावे लागते, प्रसंगी हात जोडावे लागतात, आमच्या नोकऱ्या सुद्धा संस्था आणी त्यांच्या वेतन भत्त्यावर वेतन आयोग मानधनाप्रमाणे टिकल्यात सर्व पालक आता इंग्रजी माध्यमात शाळेत मुलाना प्रवेश मिळवत आहेत, शाळेचे अती धार्मिक संस्कार मुलांचा भाबडेपणा बळाविण्याचे कारण देखील आहे आता या गोष्टी पहिल्या पेक्षा कमी झाल्यात. मराठी शाळा वाचविणे या पेक्षा शिक्षकाना निवृत्ती पर्यंत नोकरी कशी वाचविता येते का याची चिंता जास्त होती. शाळेतून एखादा नावाजलेला क्रिडापट्टू , समाजकारणी, लेखक , शास्त्रज्ञ, अर्थ ,भूगर्भ, अवकाश शास्त्रज्ञ देशासाठी मोठ्या प्रमाणात नाही घडू शकले, रोजगारी किंवा नोकरवर्ग तयार करण्याचा कारखाना घडला शेवटी याची जाणिव सराना झाली हे मह्त्वाचे होते माझ्यासाठी. खुप खुप बोलायचे आहे तुझ्याशी वेळ मिळाला की बोलू असे म्हणून सरानी व्हॉट्स अप चॅट आवरते घेतले.
राज्यशास्त्र आणी समाजशास्त्र फार मनावर घ्यायचे नसते रे, ते फक्त शिकवायचे विषय असतात, आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज महाविद्यालयीन प्राध्यापकाचे शब्द आठवले.
रहेजा महाविद्यालयाने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो आमचा बालमित्र भारत गिते हा संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राजसाहेब यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने एका पत्रात लिहिलं होतं. त्यानुसार हा शिक्षक आज दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काहीतरी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राजसाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी पोलीस तसंच त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तरी कोणतातरी द्रव पदार्थ त्याने प्राशन केला असल्याचे निष्पन्न झाले, यानंतर त्याला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता हळू हळू त्याची दखल घेतली जाईल पण मागता येईना भिक मग मास्तरकी शिक. हे असेच चालणार का ?
आणखी अशी अनेक प्रकरणे आहेत, शिक्षण क्षेत्राचा बोऱ्या वाजला आहे. शिक्षक आणी संस्था यांच्यातील राजकरणाने निचतम पातळी गाठली आहे. मुलांचे भविष्य टांगणीला लागले असताना फक्त ॲडमिशन किती झालीत आणी मतदान आणी निवडणुकांमध्ये बैल हवे असतात या बैलांचा नंदी बैल झालाय.
मध्य मुंबईच्या प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या महाविद्यालयातील एका भाषा विभागातील प्रकार जेव्हा समजला त्यावेळी शिक्षण क्षेत्रातील राजकारणाची निचतेची सिमा गाठली गेल्याचे दिसले, प्रकार निंदनीयच होता. एका माजी शिष्याने त्याच विभागाच्या प्राध्यापिकेची असलेली जागा मिळविण्यासाठी त्यांच्यावर विभागप्रमुखाशी संगनमत करीत आरोप करत त्याना पदच्युत केले होते, मनुवादी विचारांनी प्रेरीत असलेला हा प्राध्यापक पुढे ही जागा टिकवू शकला नाही आणी शिक्षण क्षेत्रातील गुरु शिष्य नात्याचा देखील इथे विचार झाला नाही. केवळ अर्थाजन आणी शाश्वत नोकरी उपजीविका भागविण्यासाठी शिक्षण क्षेत्र मर्यादीत राहीले की काय ? बाजारी पणा सर्वच क्षेत्रात बोळावला आहे पण शिक्षण क्षेत्रातील या बातम्या शिक्षण क्षेत्राला आलेला रंडवेपणा स्पष्ट दाखवतो. आपला पाल्य मोठा झाल्यावर शिक्षक व्हावा असे आज किती जनाना प्रामाणिक पणे वाटत आहे यावरून तुम्ही स्वता:ला आरसा दाखवा. 



 वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

नवस





२००१ मध्ये लिहलेली कथा...

" नवस "

‘पिरोबा’च्या देवीची येस वलांडली की म्हाडकाचा ‘मळा’ लागतो. ‘पिरोबा’च देवाळ तस खुप जुनं, पण जत्रंलाच आया ‘बाया’ नवसाची कोंबडी-कोंबडा कापाय तथं यायची, नायतर एव्हांना तिकडं कोण डुंकत सुद्धा नाय. माळावरच्या पिपंरनी मधी मधी गारवा द्यायला उभ्या हायत्या अशा वाटायच्या, तशा पाऊलवाट रुंद टेकाडवरन जाताना कुठं आंब्याच झाडं तर कुठं जांभळाची झाडं लागायची. ‘येतगाव’च्या जत्रेच्या निमित्तानं तिथं जायला व्हायचं ते बी ‘दाजी संग. त्याच येतगावच्या माळावर उसाच्या बांधाला धनगराची काय पाच-दहा घरं व्हंती. दाजी म्हणजी आमचा ‘म्हातारं’ म्हणजा आमचे ‘आजोबा’ समद्यासंग त्याचं चांगल व्हंत. श्येमा वडार, बापू वडार, नाम्या लव्हार, येश्या धनगुर अशी बरचशी मंडळी त्यांनी कामानिमित्त बांधून ठेवली व्हती.
येतगांवच्या जत्रेला येनी-देनी भागवायला दाजी यांच्या घराकडं तमाशा झाला की फिरकायचा.
त्यात बापू वडारच्या कोपच्या मणतलं पाणी इतकं गारगार असायच की‘ शहरातले’ फ्रिज फिके पडतील अशा उन्हाळ्यात, कडक उन्हात सुद्धा काव्या मडक्यातलं पाणी पिताना जीवाला खूप बरं वाटायच. ‘बापू वडूर’ अन् त्यांचा भाव लाल तिखाट चटणीला लय हावरे होते असं आम्हा बच्चे कंपनीला आजी कडनं माहित झालं व्हंत. तो दोन-दोन ‘बरण्या’ चटणी खायचा. आम्हाला लय गमजा वाटायची त्याची.
आजोबा दोन खांद्यावर घेऊन आम्हाला ‘तमाशा’ दावायचे. तिथनं पुढं आमी समदी या लोकांना भेटायचो. असच ‘येश्या’ धनगुराच्या घरी गेलो तवा त्याच्या शेजारच्या शिरपतीची ‘च्या’ पिती पिता त्यान सांगितलेली शिरपतींची गोष्ट आज देखील कुठं मेंढर दिसली, की ‘चहा’ प्यायला घेतला तरी झरकन डोळ्यापुढं उभी राहते. आता ‘नवस’ हा शब्द खूप कमी कनावर पडतो. पण जत्रा जवळ आल्या की ब-याचदा या शब्दाची आठवण येते आणि शिरपतीची ती गोष्ट न राहावून आठवायला लागते.
शिरपत आणि सईला त्याच्या लग्नानंतर मूल नव्हते. मेंढपाळीच्या व्यावसायामुळे त्या दोघानाही या गावांतून त्या गावामध्ये सतत स्थलांतर करावे लागे... आपल्या १०-१५ मेंढ्याच्या कळपामध्ये... एखाद दुसरी शेरडं पण व्हंती... म्हातारीचे आणि सईचे पटत नसल्यामुळे शिरपती तिच्यापासून दूरच रहायचा... दोघा नवरा-बायकोला मूल नव्हते. अनेक उपास-तापास करून झाले... भोळ्या-भाबड्या त्या दोघांच्या वाट्याला हीच काय ती शोकांतिका... फक्त गावच्या मुक्कामी दुपारच्या भाकरीच्या वेळेला आलेल्या कडक लक्ष्मीच्या माणसाला सईला दिलेला प्रसाद आणि सईने (केलेला) मागितलेला नवस यानंतर काही दिवसांनी मु.पो. चिखलीला असताना सईला दिवस जाऊन पुत्ररत्नाचा लाभ होतो... नवसाला देवी पावली, म्हणून मुलाचे नाव ‘देवी भैरवी’च्या नावावरून ‘भैरव’ ठेवते...
आज या मुक्कामी तर उद्या त्या मुक्कामी... मेंढी चरायला घेऊन जाणा-या शिरपतीला त्याच्या कळपाची उदरभरण आणि कुटुंबाची काळजी सतत असायची. आपल्या कळपातील प्रत्येक मेंढी आणि शेरडावर जिवापाड प्रेम करणा-या शिरपतीप्रमाणे हसण्यात १०-१५ वर्षांचा झाला होता. शाळेत जात होता. शिरपतीनेही आता मु.पो. चिखलीत आपला तळ ठोकला होता.
भैरवचे बालपण फार मजेत गेले... रानावनात आणि निसर्ग सानिध्यानात मेंढ्याच्या प्रेमात त्याचे बालपण गेले होते... कळपात नव्यानेच जन्म घेललेल्या लक्ष्मीच्या शेरडीला दोन पिल्लाचा लाभ होतो... भैरव आणि त्याचा कुटुंबाला आनंदाचा पारावर नाही राहिला... फक्त काळी आणि फक्त पांढरी रंगाची दोन पिल्ल यांच्या बरोबर दिवस खुप छान मज्जेत घालवताना कधी शाळेला जायला कंटाळा करणारा ‘भैरव’आयचा मार देखील आनंदाने खायचा... मग शिरपतीच्या मध्यस्थीने भैरव ‘सई’च्या तावडीतून सुटायचा... पिल्ल आता जराशी मोठी झाली होती. दोन्ही पिल्लांना भैरवचा चांगलाच लळा होता. तो दिसला की ती उड्या मारायची... रानावनात फिरायचा... दोस्तांबरोबर खेळायचा पण त्याचा जीव त्या दोन पिल्लांवर खूप असायचा...
इकडे शिरपती आणि सईदेखील संसारात खूश होते... शिरपतीनेही दुष्काळात आपल्या मेंढ्याच्या कळपाच्या उपजिवेकेसाठी गावातल्या सावकाराकडून कर्ज घेतले होते... त्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेडीची चिंता शिरपतीला सतत असायची... पण सई त्याला सतत आधारही द्यायची... चिखलीच्या मुक्कामी असताना शिरपतीने एका पडक्या घराचा देखील आपल्या संसारासाठी उपयोग केला होता. भटक्या आणि विमुक्त जातीसाठी सरकारी सवलती आणि योजनांचा शिरपतीसारख्या पोटापाण्यासाठी भटकंती करणा-या लोकांना काहीच मागोसा नसतो... शिरपतीने कर्ज घेतलेल्या सावकाराच्या ‘महिपतराव’ला देखील मूलबाळ होत नसते. अशावेळी मागल्या ‘पीरबाबाच्या’ जत्रेमध्ये त्याच्या बायकोने ‘चांगुणानं’ केलेल्या नवसामुळेच आपल्याला पुत्रप्राप्ती झाली यामुळे सावकारही खूश असतो. पण यंदाच्या जत्रेत आपण नवस फेडायचा असा त्याचा घाट असतो. केलेल्या नवसाप्रमाणे चांगुणा पांढ-या रंगाचे कोकरू बळी देईन असे म्हणाली असते... यंदाची जत्रा तोंडावर आली असताना सावकाराला चांगुणा याची आठवण करून देते... सावकारही ह्या जत्रेत तो नवस फेडण्यासाठी अशा कोकरूच्या शोधात असतो. पण त्याला फारसे काहीच यश येत नाही. शेवटी कामावरच्या गड्याच्या सांगण्यावरून त्याला शिरपतीकडे अशाप्रकारचेकोकरू आहे असे कळले... जत्रा तोंडावर आली असताना चांगुणा देखील महिपतरावाकडे यासाठी मागे लागते.
सावकार शिरपतीची भेट घेऊन त्याच्याकडे असलेल्या कोकरांसाठी मागणी करतो. पण शिरपती बळी साठी तयार नसतो. तो म्हणतो, “माझ्या कळपातील सगळे कुटुंबासारखे आहेत. लेकराचा आणि बायकोचा जीव देखील अगदी पोराबाळाप्रमाणे आहे.” तुम्हाला पाळायला हवं असलं तर देतो... पण बळी नको... सावकार खिन्न होऊन परततो... इकडे शिरपती आणि सई चिंतीत होतात... चांगुणा हट्ट करते... नवस काही झाल्या फेडायला हवा... तुमी काय बी करा पण नवस पूर्ण करा... दुस-या दिवशी सावकार पुन्हा शिरपतीकडे कोकराची मागणी करतो. कर्ज फेड किंवा कोकरू दे... कर्ज फेडणे अशक्य असते... भैरवलाही या गोष्टीचा पता नसतो. तो त्या कोकराबरोबर खेळताना बाप त्याला पाहतो... सावकाराकडेदोन दिवसाची मुदत घेऊन शिरपती निवांत होतो... दोघा नवरा बायकोला झोप येत नाही ते दोघं शेवटी कोकरू भैरवला न सांगताच द्यायला राजी होतात.
सावकार दुस-या दिवशी जत्रा असल्यामुळे कोकराला घेऊन जातो... जाताना सावकार शिरपतीला काही पैसे देतो... भैरवला जत्रेच्या दिवशी कोकरू कुठेच दिसत नाही... सई आणि शिरपती म्हणतात इथेच कुठेतरी असेल... असे म्हणून समजावतात... पण भैरव त्या कोकराला शोधायला निघतो... वाटेत ‘संपत’ नावाचा त्याचा मैतर भेटतो... तो सांगतो, ‘महिपतरावानं’ तुझ्या बाबाकडून कोकराला विकत घेताना त्यानी बघितलयं... तू वाचीव त्याला... आज महिपती दुपारच्या पारी त्याला पीरबाबाला बळी देणार हाय... भैरव तसाच पळत घरी जातो... रडवेल्या भैरवला दोघेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण भैरव ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. तो भांडून ते पैसे शिरपतीकडून काढून घेतो... आणि सावकाराला द्यायला पळत सुटतो... सावकारच्या घरी पोहोचतो तिथे त्याचा गडी सांगतो... महिपतराव बळी द्यायला टेकडीच्या पीरबाबाकडे गेलेत... म्हणून इकडे भैरव तडक धावत टेकडीच्या दिशेने जातो... भैरव धावतोय, हातात पैसे आहेत. महिपतराव आधीच टेकडीवर कोकराला बळी द्यायला सज्ज आहेत... त्याला पाणी पाजून देतात, सु-याला शेवटची धार होतेय... कोकराच्या गळ्यात माळा आहेत... भैरव धावत तिकडे पळतोय... गुलाल उधळला जातोय... आणि भैरव पोहोचणार इतक्यात सुरा कोकराच्या मानेवरून फिरतो... भैरवच्या हातातली पैशाची थैली पडते... भैरव स्तब्ध... थैलीतील काही नाणी घरंगळत पीरबाबाच्या दगडापर्यंत जातात... रक्ताचे चित्कारे त्या दगडावर देखील उडालेले असतात... भैरव तसाच रडत परत पळायला सुरुवात करतो... फक्त चढीच्या रस्त्यावर भैरव पळतोय... क्षितीज टेकलेल्या ठिकाणी भैरव हळुहळु दिसायला लागतो... रडवेल्या भैरवला त्या चढीच्या ठिकाणी दम लागतो, तो गुडघ्यावर हात ठेवून तसाच उभा राहतो... डोळ्यात कारुण्याचे भाव उमटले आहेत...



वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

मास्तरांची शाळा






मास्तरांची शाळा 



कथेची सुरूवात होते ..''सांगली जिल्हा, 'कडेगांव' तालुक्यातील एका संपुर्ण साक्षर अशा आदर्श अशा गावी. गावाच्या ग्रामपंचायती कार्यालया बाहेर नोटीस बोर्डावर जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की सगळ्या शाळेच्या मास्तरांची 'कडेगांव' तालुका वारी पक्की ठरलेली असायची, बाजाराच्या दिवशीच तालुक्याला जाणारे समदे यावेळी तासाला तालुक्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, पक्ष कार्यालयात, बाजारात, पाराच्या झाडाखाली नाहीतर 'सरकारी देशी दुकानात' हजर असायचे निवडणुक प्रचार, पोलिंग बूथ असो की मतमोजणी समद्या कामाला हे जुपले जायचे, तालुकाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,आमदार,खासदार,पक्षनेते, अपक्ष नेते समद्याना यांचा मुजरा व्हायचा. गाड्या भरुन भरुन नोटा तालुक्यावरुन गावागावात पोहचायच्या. वर्षभर अन्ना वाचुन दुष्काळ भोगलेले रात्री कोंबड्या, मटणावर तुटून पडायचे. नेत्यांच्या ,सरपंचाच्या वाड्यावर न अन मळ्यात रात्री फक्कड लावणी जमायची, पैसा उधळला जायचा. मास्तरांचे घोळके बीयर च्या बीयर बाटल्या रेचवायला दंग व्हायचे, इतिहासाचे 'मोहीते मास्तर' तोंडात चना,चिवड्याचा चकना टाकत दारुचा इतिहास सांगुन जायचे तर, भुगोलाचे पिसाळ सर तोंडातील तंबाखू बाजुलाच थुंकत..'मदीरेची उत्पत्ती,कालखंड सांगणार इतक्यात त्याना मद्य उत्पादन फायद्या- तोट्यावर गणिताचे 'जावळे' सर दोन पेग आधीच रेचवून ग्लास पुढे करायचे, तोच इंग्रजीच्या साने मास्तरानी देशीवर टिका करत नाक मुरडत इंपोर्टेड 'रोझ वाइन' चकचकीत ग्लासात घेत तुछ कटाक्ष टाकून... तुम्ही सगळे कसे अजुन मागास आहात... 'यु आर नॉट जंटलमन कलीग्स,.....यु पीपल नॉट ड्रिंकिंग इंग्लीश...असे तसे काही बाही बरळत बरळत शेवटी स्कॉचss शब्द बाहेर आला आणी हे महाशय नुसत्या वाइन मध्येच आडवे झाले. साने मास्तरांचा मुलगा अमेरीकेत उच्च शिक्षण घेतोय, आपल्या 'डॅड' साठी मधुन मधुन भारतात आला की आणतो एखादी काळी निळी वाइन ची बाटली. इतक्यात कोणाच्या तरी तोंडात 'तकीला पाहीजे होता रे श्याss असा उल्लेख आला पण ते काय असते हे माहीत नसल्याने मराठीच्या 'जोशी' सरानी तोंडातल्या तोंडातच माघार घेतली. तमाशा साहीत्य संस्कुती बद्दल भरभरुन बोलता बोलता तिथल्या तमासगीरीच्या पायातल्या घुंगरांवरुन बोटे फिरवत गळ्यात हात घालणार..इतक्यात 'अय काय बोलयचय ना ते लांबन..पायतान काढाय लावू नका' तमासगीर बाई भडकलेल्या बघुन संस्कृतचे कुलकर्णी मास्तर लगेच 'अरे बापरे हीss हीss ( असे खोटेच हसत) सॉरी हा...वेरी सॉरी..मला काय ती जोश्यांची 'शंकुतलाच वाटली' हाहा असे म्हणत.. 'जोशी मास्तराना डोळा मारत' जरा आलोच हाss डोळ्यावर पाणी मारून' असे म्हणत आत जे गेले ते बैठकीला परत न येता, व्हराड्यातच बसुन 'विस्कीचा विथ सोडा... लार्ज ग्लास' आस्वाद घेवू लागले. सगळा तमाशा चालु होता' ..आताची शिक्षण पद्धती कशी चुकीची आहे.. इथपासुन ते 'मंत्रीमडळात आणी निवडणूकीत 'शिक्षकाना जास्तीत जास्त आरक्षण मिळाले पाहीजे आणी... 'एक शिक्षकच देशाचा पंतप्रधान झाला तरच तो हा देश आपण 'तारु' इतक्यात ...'दारु....कोणीतरी मध्येच बोलले.. झिंगलेले भुगोलाचे 'कांबळे मास्तर' आता डुलायला लागले होते. सगळा प्रकार डोळ्यानी शांत पणे पाहून साधे सरळ दिसणारे सायन्स शिकवणारे निवृत्त 'यशवंत कदम' मास्तर या तरुण शिक्षकांच्या व्यवहारावर काहीच बोलत न्हवते. काळ बदलला आहे, "राजकारणच 'शिक्षण' आणी शिक्षणाचेच ' राजकारण' झालेय हे त्याना माहीत होते की काय त्यानी हातातली काठी सावरली, डोक्यावरची गांधी टोपी घालायला आता शाळेच्या पोराना बी लाज वाटते, पण कदम मास्तरांना स्वता:ची गांधी टोपी सावरताना, आणी विसरताना कधीच पाहीले न्हवते. हातातली काठी, चेहऱ्यावर लख्ख तेज, करारी बाण्याचे आणी सरळ स्वभावाचे असे उच्च बुद्धीवादी विचारांचे' ते या व्यवस्थे विरुद्ध लढण्याच्या भानगडीत कधीच पडले नाहीत. आता मास्तरांचे वय झाले होते, 'आवाजातल्या हरकती आणी डोळ्यात दाटलेले पाणी, शरीरावरच्या स्पष्ट दिसणाऱ्या सुरकुत्या आता आणखी स्पष्ट दिसत होत्या, झिजलेल्या चपला आता 'करss करss' असा आवाज करत न्हवत्या.शाळेत वर्गात मास्तर येतायत हे शाळेच्या तासाच्या घंटे पेक्षा मास्तरांच्या चपलांच्या आवाजानेच आधी समद्या वर्गाला कळायचे. आज मास्तरांची दोन्ही पोर सैन्यात मोठ्या हुद्द्यावर देशाची सेवा करतायत...ऱोज सात किलोमीटर सायकल तर कधी चालत शाळेचा बिकट प्रवास आणी नोकरी करणारा मास्तर...."झिंगुन आडवे झालेल्या एक एका शिक्षकाच्या 'प्रेताला' त्यांच्या घरी व्यवस्थीत पोहचवायची जवाबदारीचा 'आदेश' सर आंखोपर ठेवून पुढची पिढी सुरक्षीत करत होता. डोळ्यात पाणी दाटुन आले...आता 'गुरुदक्षिणा' शब्द मराठी साहित्य विश्वशब्द कोशातुन कुठे हरवू नये याची भिती वाटु लागली होती मला..!





वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com



समाधी




समाधी

"दाजीला" आवाज देत हातातली काठी भीताडाच्या कडला ठेवून धुरपा म्हातारी वाड्याच्या खांबाचा आधार घेत आत येत एक एक पाऊल टाकायची, "दाजी" आसल का नसल तरी पण धुरपा कधी "दाजी" तर कवा "आणणा" अशी हाळी द्यायला इसरायची नाय. तस "धुरपा" म्हातारीच घर आमच्या घरापासन जवळ व्हत, तिच्या घराची एका बाजूची पांढर्‍या मातीची लिपलेली भिंत कोसळेली व्हती, घरावरची कौल्ल एखाद दुसर पूर्ण असल, बाकी सारी जमीनीवर "पारीजातकाच्या" सड्यासारखी पहुडलेली व्हती, पण गावाकडच्या "बाभुळ" किवा जंगली लाकडाच झाड असो, घराला वापरण्यात आलेल्या लाकडानी अजुन तरी दगा दिला नव्हता, घरा समोरच एक समाधी व्हती, मला त्या समाधीच फार कुतूहल वाटायच, मला त्याचच काय पण गावातल्या प्रत्येक समाधी बद्दल नेहमीच "कुतूहल" वाटायच, गावाकडची माती असो की दगड त्याला जो आकार द्याल तसा त्यो आकार घडत जातूया, कुणी त्या माती, दगडाला देवळासाठी वापरतात तर कुणी त्याला समाधी साठी वापरतात. धुरपा च्या घरासमोर असलेल्या समाधी वर माणसाच्या पाऊल खुणा कोरलेल्या व्हत्या, म्हंजी कारागीरा कडून कारीगीरी करून घडवल्या होत्या म्या पण ती समाधी कुणाची हाय हे इचारायच्या फन्द्यात कधी पडलो नाय. समाधी शेजारी असलेल्या भेंड्याच्या झाडाला धुरपाची शिरडी बांधलेली व्हती. तिची दोन पिल्ल मोकळ्यावानी तिथच आजु बाजूला बागडत मस्ती करत फिरायची, कधीकधी समाधी वर चढायची, त्या समाधीवरच इकड तिकड तिथच त्यांच्या लेंडया पडलेल्या असायच्या. खरतर या गरीब शेराडाशिवाय धुरपाला दुसर नात न्हवत, एक पोरग व्हत अस कुणाच्यातरी बोलन्यातन माझ्या कानावर आल व्हत, पण लग्नानंतर त्ये येगळ राहायला लागल, तस धुरपाकड बघायला कुणीच न्हवत, काठी टेकत जिवाला सांच्यापरी थोडा आराम मिळावा म्हणून धुरपा आमच्याकड यायची, मला धुरपाच आमच्या कड येन आवडत नसायचा, कारण ती काय जास्त बोलायची न्हाय, माझी आजी पण मला "आय" सारखी वाटायची पण धुरपा मला परकी आजीच वाटायची आन् धुरपा घरी यायच्या आधी आय आमची धुरपाची भीती घालून मला दूध पाजायची, "आय" म्हणायची दूध पी नायतर धुरपा इल, आन् त्या बोचक्यात घालून तुला घीऊन जाईल. मलाच काय पण आमा बच्चेकंपनीला धुरपाची भीती वाटायची. धुरपा यायची, नियतीला नाती कळत नसतात बहुतेक, म्हणून की काय सख्या पोटच्या पोरान "नातवंड" तिच्या जवळ ठेवली न्हवती, प्रेमपाय आमाला नातवंड समजून जवळ घ्यायचा प्रयत्न करायची. गावा कडची साधी भोळी माणस ती त्यानाच ठाऊक की प्रेम,माया, नाती काय असतात ती. हल्ली जेह्वा केह्वा मी गावी जातो मला कोणत्या तरी माणसाच्या जाण्याची, त्याच्या निधनाची बातमी कानावर पडते, तसा मायेचा आणखी एक झरा आटल्यासारखे वाटत राहते, तशी माझी पणजी भलतीच तुसाड व्हती कारण तिला धुरपा घरी आलेली कधी खपलीच नाय, ती तिला सारखी कोंबड्या कुतर्‍या वरुन टोचून बोलायची. धुरपा तिच्या घरातन निघताना समाधीकड एक नजर टाकत घरच्या रस्त्या कड चालत काठी टेकत यायची, आमच्या आयन एकदा मला सांगीतल की ती समाधी तिच्या धन्याची / कारभारयाची ची हाय, राहायला घर व्यवस्थित नाय, पण आपल्या धन्यासाठी तिन गाठीशी जोडलेला एक एक पैका खर्चून ती समाधी बांधली होती. पावसाळ्यात धुरपा घरी यायची, ती कोपरयातल्या सोफयात पहुडलेली असायची, तिच्याकड एक घोंगड असायच त्याच घोंगड्याला मी दर उन्हाळ्यच्या सुट्टीत गावी आलो की पहायचो. धुरपा पाठीच्या कण्याच्या आजाराने त्रस्त असल्यान चालताना नेहमी जराशी वाकुनच चालायची. काठीचा आधार तिला आयुष्यभरासाठी सोबतीला लागलेला व्हताच, पण तिच्या डोळ्यात मात्र असे कधीच दिसले नाही की तिला कशाचे तरी दुख बोचत असावे. मला ती सगळ्यांचीच आजी असल्यासारखी दिसायाची. धुरपा कड बघायला कुणीच न्हवत. काठी टेकत जिवाला सांच्या पर थोडा आराम मिळावा म्हणून धुरपा आमच्याकड यायची. प्रेमापाय आमालाच नातवंड समजून जवळ घ्यायची, पण मला त्यावेळी तिची माया कळली नाही. माझ्या आजीला धुरपा घरी आलेली खपायची नाय ती तिला सरळ जा म्हणू शकत नसल्याने तिला सारखी कोंबड्या कुत्र्या वरुन बोलायची. धुरपा पावसाळ्यताल्या दिवसामध्ये पाठीवरुन घोंगड किवा गोणपाट टाकून बाहेर पडायची.निघताना समाधीवर एक नजर टाकून बाहेर पडायची का कोण जाणे तिचा देवावर आता विश्वास राहिला नसावा बहुतेक. माझी आय मला म्हणाली होती की ती समाधी तिच्या नवर्‍याची हाय म्हणून, तेव्हा मला माहीत झाल. पण राहायला घर व्यवस्थित नसलेली धुरपा नवर्‍याच्या समाधी साठी गाठीला पै न पै जमा करून बांधून घेतली व्हती. तिच्याकड असणार्‍या घोंगड्याला मी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आलो की पहायचो, धुरपा इथच भाकरीच दोन घास खायची, आयुष्य कष्ट करण्यातच गेल व्हत, कालवन नसल तर ती चटणी –भाकर खाऊन दिस काढताना दिसायाची, धुरपाच्या अंगावर एक फाटक आन् एक बर्‍या पैकी "फाटक" अशी ती हिरव्या आन् मोर पिशी रंगाची लुगडी वापरत असायची. तीन वर्षापुरवी जवळच्या नात्यातल्या लग्नात आहेर मिळालेली लुगडी व्हती. धुरपाच्या काबाड कष्ट करून आणी वयाच्या मानाने आलेल्या चेहर्‍यावरच्या समाधानी रेषा आता जास्तच गडद आणी मोठ्या झाल्या व्हत्या. कसल सुख आणी कसल दुख: लपवनार ती, कारण सुख: म्हंजी काय त्ये त्या बिचारीला काय ठाऊकच न्हवत. डोळ्यांच्या कडा नेहमी पाण्यान भरलेल्या असायाच्या दर दिवसाल ते आसवांचे थेंब सुकल्यावर त्याचे वन मला चेहर्‍यावर दिसायचे. कपाळावर मेन लावल्या नंतर आयुष्यभर ज्याच्या नावाने लाल मळवट भरला व्हता, आज त्या जागेवर तिथ कुकू न्हवत तर गोंदल्याच्या खूना आणी त्याचा ठसा उमटलेला दिसायचा, आयुष्यभराची पायपीट आणी पायाना पडलेल्या भेगात विलक्षण सामर्थ्य असलेल जाणवायच, पण आता ते वयाच्या मानाने हरवलेल दिसल. या येळेला गावी आलो त्या वेळी हसन्या खेळण्यात माझ दिवस गेले. आन् पाणी भराया बोरजवळ जायच्या वेळी माझ सहज धुरपाच्या घराकड लक्ष गेल. धुरपाची "घोंगडी" भेंडीजवळच्या भीताडावर फाटून झीजलेली मला दिसली, भेंडी जवळची शेरड पण मला तिथ दिसत नव्हती. तिच्या लुगड्याच्या रंगाची फडकी घराजवळ पडलेली दिसत व्हती, घर होत तसच होत. कुणी आसल का नसल तरी त्या घराला कुलुप लावलेल कधीच नसायच,आताही ते न्हवत. घरात चेपलेली टोप, फुटलेली चूल, भिताडात असलेल तुटलेल्या लाकडाच कपाट माती पडून झाकल गेल व्हत. कदी नाय पण या येळला गावकडल्या लाकडान दगा दिला व्हता. घरच्या छपराच मधल लाकूड कना मोडल्यागत आत पडल व्हत. मी तसाच धावत घराकड वळलू तर तिथ धुरपा न्हवती, म्या सुदीक तिच्या भितीमुळ ती कुठ हाय हे कुणालाच इचारल नाय . पावसाळ्याचे दिस सुरू झाले, इजांचा कडकडाट सुरू व्हता, इजा चमकू लागल्या व्हत्या. पाऊस धो-धो कोसळू लागला व्हता, आमी समदी पोर सोफयात पडणार्‍या गारा येचायला बाहेर पडलू आन गारा मारत एकमेकांशी खेळू लागलू. माझ्या अंगाला गार जोरात लागल्यान म्या रडायला लागलू. मला रडताना बघून आय भाकरी चुलीजवळ थापत थापत मला आतूनच म्हणाली, गप बस की रे बोकाडा वर म्हातारी आभाळात दळतीया अं तुझ्या किरडीचा दान्डा निखाळलाय हूय र, म्या पटकन गप झालू, आन् वर आभाळात पाहील .... "म्हातारी दळतीया" ?? म्हंजी आमची धुरपा म्हातारी आभाळात बसून दळतीया, आज जेव्हा जेव्हा असा मोठा विजा चमकून पाउस येतो, अंगणात हलक्याच पांढर्‍या शुभ्र रंगाच्या गारा पडतात, हलक्याच सरींच्या पहिल्या पावसात मातीला गंध सुटतो तशी आपल्या नात्यातल्या आन् नात्या पेक्षा जवळच्या लोकांच्या आठवणींचा मनाला गंध सुटतो, नकळतच डोळे ओले होतात, प्रत्येकाच्या आयुष्यातला एक म्हातारा बाबा किंवा एक म्हातारी आजी पुन्हा हळूच मागून येईल आणी आपल्या गालावर हात फिरवत आपल्या हाताने, पदराने आपले डोळे पुसेल असे न रहावून वाटत राहते आणी कुठेतरी ओसाड माळराणावर कोसळलेली वीज क्षणात मनावर कोसळलेली भासुन रहाते, धाडकन डोळे जागे होतात, पुन्हा पावसाच्या बातम्या, टी.व्ही चॅनेल, रिमोट आणी मोबाईल याना आपली नात्यांची जागा देऊन पाउस थांबण्याची वाट बघत बसतो.




 वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

गावाकडला 'आबा' अन मराठा मोर्चा


 
 
 
 
गावाकडला 'आबा' अन 'मराठा मोर्चा' !!


फेटा,धोतर, पैरन घालुन सायकलीला पायडल मारुन गावाकडला 'आबा' प्रत्येक गावात असतो अगदी तसाच रांगडा उंच पुरा पैलवान गडी..आमच्या 'कोतीज' गावात व्हता. आमच्या येळला, सायबाच्या येळला इथ पासून ते कुस्ती च्या मैदाना पातुर पारावर सुरु होणारी चर्चा आन त्या चर्चेत आमच हे आबा. शेताकड गेल की सोबतीला मोत्या असतुच त्याला दगुड हाणून परत घरा कड जायला लावतील तर कधी सायकल चा पंचर काढायला शेजारच्या गावकड हिरवी नायलॉन ची थैली घेवून एकटेच आपला रस्ता काढत निघतील. 'खेड' गाव असल्याने मधन कुठन बी मार्ग काढीत शेतातल्या भांगलणारया संभा ला आवाज देत इचारत काय यंदा मका जोरात दिसतुय तुझा वढ्याजवळ.. ऐकत नाय लेका अस बोलुन इजच्या खांबाला सायकल टेकवीत काढ की तंबाखू.. अस बोलुन आबा घरातल्यांशी विचारपुस करत पुढच्या प्रवासाला निघायचा. कुठ पाटावरल पाणी चुळ भरुन तसाच फेट्याच्या कापडाला तोंड पुसत आबा सायकल ढकलत ढकलत पुढ निघायचा. पंचर वाल्याकड सायकल लावून आबा दाढी करायला येश्या न्हाव्याकड जावून बसायचा. तिथल्या गप्पा झाल्या की पाराजवळ चिचच्या झाडापाशी सगळ्या पैरन वाल्या लोकामधी मिसळून जायचा. कोण लेंगा घालणारा तर कोण एखादा दुसरा पॅंट घालुन शहरी वास्तव्याचा दाखला देणारा असायचा. आबा ची सुरुवात व्हायची आमच्या येळला... सगळ्या चर्चा झडायच्या. अगदी राजकारणापासून ते खेळा मेळावर भावबंदकी न शेतातल्या पिकावर. आजच्या सारखे सोशल माध्यम त्यावेळी न्हवते. त्यामुळे डिस लाईक, कमेंट,ब्लॉक, रिपोर्ट अशा थिल्लर गोष्टीना मैत्रीत स्थान न्हवते. त्यामुळे आत्मीयता, प्रेम, माया एकमेकांनबद्दल प्रचंड असायची. गावाकडला असल्याने समाज एकमेकांशी बांधून ठेवला होता. एकमेकांच्या समदु:खात आणी सुखात सारेच हरवून जायचे. म्हातारीला नव लुगड आणल्यावर तिच लाजन सांगताना आबाच्या गालावरच हसु बघण्याजोग आसायच. संस्कृतीच्या पोकळ गप्पा कधीच या मंडळीच्या गप्पात नसायच्या दिलखुलास न मोठया मनाची माणस.. आपला समाज आपला समाज कधी असा वागला कधी तसा वागला पण समाजाला सोडून कधी गेले नाहीत. आबाच्या पारावरच्या बोलण्यातन पोराला नोकरी लागना कुठ वशीला असाल तर बघा, पण पारावरल्या अर्ध्या धिक लोकांच्या पोरांची तिच अवस्था..आबा मलुल होवून जायचा. घरी म्हातारीला सारखा म्हणायाचा पोराला एकदा सायबा सारख बघायचय. पण पोराला नोकरी काय लागलीच नाय. कुणी पैसे मागतया तर कुणी वशीला विचरतोया. समाज आमचा पारावरच्या गप्पा मधीच एक झालेला दिसायचा. प्रत्येक गावातला आबा हतबल..निराश, उदास. म्हातारी सोडून गेली तवा देखील आबाला साथ देणारी सगळी मंडळी येवून जात होती. मरता मरता म्हातारीला आबा बोलला, तुह्या लेकाला नोकरी करताना बघतो न तुझ्या कड येतो. पोराला नोकरी काय केल्या लागना, आन समाज दुसऱ्या गुजराती मारवाडी समाजासारखा उद्योग सहकार करायला पुढ येइना. समाजातले नेते मंडळी मोठी झाली पण समाजाला गुलाम करत गेली. आबा कधी यांच्या पुढ झुकला नाही की पोराच्या नोकरी साठी हात पसरले नाही. पारावरच्या गप्पात आबा बोलायचा, कवा आपला समाज एक होइल न आपल्या पोरा बाळासाठी अन त्यांच्या भविष्यासाठी एक संघर्ष करील. आबा म्हातारीच्या फोटो कड बघत बघत तसाच निघुन गेला. जाताना डोळे उघडे होते. त्याच्या पोराला अजुन नोकरी न्हवती लागली. त्याची कारणे कळायला त्यांच्या पोराना रस्त्यावर यावे लागेल असे कधीच वाटले न्हवते. गावाकडच्या आबा ची इच्छा पूर्ण करायची जवाबदारी आज आपल्या समाजातील प्रत्येकाची आहे. आबाच्या मोत्यान मालकाशी असलेल इमान राखल. कोतीज गावचा आबा गेल्यावर मोत्यान त्याच्या चितेत उडी घेतली. आज समाज एकवटला आहे, आपले इमान आपल्या समाजाशी राखायची हीच योग्य वेळ आहे. आबाला त्याची स्वप्न पुर्ण झालेली बघायची आहेत. पैरन गेली, फेटा गेला धोतर सुद्धा गेल समाजातला आबा गेला पण संघर्षाचा धागा बनुन गेला.... उठ मराठ्या.. पेट मराठ्या...
माझ्या आवडत्या आबा साठी एक धागा हो. मराठा क्रांती मोर्चा, मराठ्या जागा हो... !!

वैभव जगताप
 
 
वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

 

अमृत- विषाचा प्याला





अमृत- विषाचा प्याला !!



.....तो रोज येत नाही, तो कोणापुढेही हाथ पसरत नाही. तो धर्म प्रसारक नाही ना भिक्षुक, पण वर्षातुन न चुकता प्रत्येक गावात एक फेरी मारुन लांब लांब चा प्रवास करत 'भिमा' खानापुर तालुक्यातुन कर्णाटक सिमावर्ती भागातुन आपल्या बायको आणी लहान मुलीसह डोक्यावर देवीचा प्रचंड वजनाचा गाडा घेवून महाराष्ट्रातील ..सांगली,सातारा,कोल्हापुर,सोलापुर इथली बरीचशी गावे पालथी घालत फिरत असतो.
'आई राजा उदो उदो..उदे ग अंबे उदे" करत दरवाजात उभा राहीला, की भिमा शिवाजी महाराजांच्या एखादया लढवय्या 'मावळ्या सारखा भासायचा मला..धडधाकट शरीरयष्टी आणी कपाळावर पिवळ्या धमक बेलबुट्टीवर लाल कुंकवाचे ठिपके भिमाला शोभुन दिसतात. उण्हात फिरुन फिरुन रापलेला काळा तांबुस चेहरा,काय तर तो रुबाब..काय तर ते व्यक्तीमत्व, पांढरपेशा मनाला कुबड झालेल्या लोकाना त्याच्यात 'व्यक्तीमत्व' दिसनारच नाही डोक्यावरचे अनुभवाने पिकुन पांढरे झालेले केस मिशीपर्यंत आणी रुबाबदार पिळदार पांढरया मिश्या. कमरेला गुंडाळलेला रक्तरंगी झगा त्यावर असलेली फुले. कुठेही पोषाखी कलेचा दिखावा नाही. खरी कला 'जगणे' अर्थात यालाच म्हणत असावेत बहुधा. बायकोच्या गळ्यात दान जमा करायची झोळी. कुठे कुठे फाटलेली आणी ठिगळ लावलेली जिर्ण मळखाउ रंगाची साडी बायकोच्या अंगावर असायची,गळ्यात मंगळ्सुत्र नाही पण काळ्या धाग्यात गुंफलेले मणी आणी पायात मासोळी जोडवी, पोरगी परकर पोलक घातलेले जरा लाजुन आईच्या मागे लपायची, भिमा अनवाणी पायानी गावोगावी फिरायचा,कोणा पुढे हाथ पसरताना भिमाला मी पाहीले नाही. भिक्षुकी मागुन उदर निर्वाह करने हा त्याचा उद्योग नाही, मोठ्या मोठ्या देवस्थानात असलेले कर्म दरिद्री पंडित/भटजी प्रमाणे तो नाही, देवस्थानात देवाच्या नावाने पैसे उधळुन किंवा पेटीत टाकुन पुण्य कमावणे इतके सोपे असते तर विचारुच नका जगात पापाला स्थानच राहीले नसते..मी दोनच वेळा भिमाला भेटलो होतो, इतक्या दोनच भेटीत तो मला जितका उलगडला तितका मला तो 'देवीचा जोगी' म्हणा किंवा हव तर 'पोतराज' म्हणा. पण त्या पेक्षा एक 'माणुस' म्हणुन मला जास्त जवळचा वाटला. भिमा च्या वडीलांकडुन देवीचा गाडा घेवून फिरायचा वारसा भिमाला मिळाला होता. देवीचा 'कौल' देने हा ज्याच्या त्याच्या इछेचा प्रश्न म्हणुन भिमा तो देत असे. पण हे कौल वगैरे देने स्वता: भिमाला पटत नाही. अंगठाबहाद्दर असलेल्या भिमाला उपजीवीकेचे साधन आणी वडिलोपार्जीत सेवेचा भाग म्हणुन देवीचा गाडा घेवून फिरावे लागते,
'भिमा देव धर्म मानत नाही, नशीबापेक्षा कर्मांवर त्याचा असलेला विश्वास मला फार दृढ वाटला, वडिलोपार्जीत पोटापाण्यासाठी भिमा नाइलाजाने हे करतो आहे, भिमा नास्तीक आहे हे, हे त्याच्या तोंडुन ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले. हे कसे शक्य असु शकते, देवीचा गाडा घेवून फिरणारी व्यक्ती देव धर्म मानत नाही, बुद्धीवाद्याना बुचकळ्यात टाकणारा प्रश्न होता पण वस्तुस्थीतीही होतीच ती माझ्या नाकारण्याने बदलु शकणार न्हवती,
तो कोणापुढे ही हाथ पसरत नाही,ज्या घरी दिले तिथे प्यायला पाण्याचा तांब्या आणी मुठभर धान्यच तो खुशी खुशीने घेतो आणी पुढच्या घराकडे जायला निघतो. भिमा वर्तमानात जगतो. त्याला मोठ्या मोठ्या मंदीर - मस्जीदीतल्या पंडीत आणी मौलवी प्रमाणे खर्चीक पुजा अर्चा,ग्रह शांती,दोश-प्रदोश, नमाज, दर्ग्यात चादर किंवा गुलाब अथवा बळी सांगुन दक्षिणा मागुन जगणारया दळभद्री धर्माच्या ठेकेदारांकडुन देवा धर्माच्या, अल्लाच्या नावावर भिती घालुन स्वता: घबाडे कमावणारी धर्मांध धेंडे पाहीली की विद्न्यान युगाच्या काळ्या बाजुची आठवण होते , पोटापाण्यासाठी आस्तीक नास्तीक झालेले मी अनेक पाहीलेत पण भिमा ची कहाणी एकुण खुपच आश्चर्य वाटले.
भिमाला एक मोठा मुलगा आहे, तो कोल्हापुरात राहतो, नित्य नियमाने कुस्तीच्या तालमीला जातो. त्याचा खुराक खर्च खुप आहे. पण भिमाला आपल्या लाडक्या पोराला भारतीय सैन्य दलात पाहण्याची इछा आहे. कुस्तीतुन पिळदार शरीर कमावून देण्यासाठी भिमा हा देवीचा गाडा घेवून दारोदार फिरत असतो.अंधश्रद्धा पसरवन्याचा हेतु नाही पण श्रद्धेचा बाजार मांडन्याचा ही त्याचा प्रयत्न नाही.म्हणुन तो कोणापुढेही हात पसरवत फिरत नाही.
त्याच्या देवीच्या गाड्यात पैशाचा गल्ला नाही..
..मुलाला सैन्यात पाहण्याची स्वप्ने पाहणारा भिमा अमृत- विषाचा प्याला भासला मला त्यावेळी...
आज किती तरी देवा धर्माचे ठेकेदार आणी धर्माचे सोयीस्कर राजकारण करणारया 'राजकारण्यांची पोरे 'भारतीय' सैन्यात आहेत ??
..पण इथे सामान्यातल्या सामन्य माणासांचे विचार देखील कधी कधी आपल्याला 'विचारात' पाडतात.मी देव पाहीला नाही तो कसा आहे त्याचे विश्वरुप कसे आहे काही काहीच माहीत नाही पण भिमा सारख्याच सामान्य माणासामध्ये मला 'देव' दिसतो जो देवा धर्मा पेक्षा देशहिताला प्राधान्य देतो.. जो देशा साठी आपला विर मुलगा द्यायला तयार असतो.
सलाम माझा त्या प्रत्येक आई बापाला ज्यानी देशा साठी आपला मुलगा दिला आहे...

जय हिंद !


वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

 

दगडफुल आणी माळरानावरचा पाउस





'दगडफुल" आणी "माळरानावरचा पाउस" !!

 


(सत्य घटना )
सिदगोंडा आण्णासो पाटील, खानापुर तालुक्यातील 'बेळगाव' जवळच्या अतीदुर्गम खेड्यातुन पायपीट करत उदर निर्वाह करणारया महाराष्ट्रातील तमाम 'भटक्या' आणी 'विमुक्त' जातींचे प्रतीनिधीत्व करणारया महाराष्ट्राचा खरा 'आरसा' म्हणा किंवा 'बोलका चेहरा'
'आसवेच' स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली'..या ओळींचा प्रत्यय वास्तवात येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे खरे तर..
घरोघरी फिरुन दारोदारी जावून स्त्रियांच्या साठवून ठेवलेल्या केसांच्या पुंजक्यांच्या बदल्यात त्या त्या स्त्रियाना पिना,चाफ,गोंडा,कंगवा,रिबीन,टिकल्या आणी इतर साज व केशशृंगारीक वस्तु मोबदल्यात देण्याचे काम कंत्राटदाराकडुन या पोरांच्या हातुन केले जाते. या जमलेल्या केसांचा पुढे केसावळ,गंगावण तसेच तत्सम कुत्रिम केशनिर्मीती साठी उपयोग केला जातो असे सिदगोण्डा ने सांगीतले. हे सर्व जमा करताना फिरताना पंधरा ते वीस गावे पायी विना चप्पल तुडवून झाली की परतीच्या घराकडे खोपेच्या प्रवासाला निघायचे. घरातुन 'डबा' 'शिदोरी' असे कधीच नसते.वाटेत जे जे मिळेल ते ते खाणे आणी पोटापाण्यासाठी फिरणे. मध्येच उस खाउन पोट भरने,कोणाच्या शेतातुन हरभरा काढुन खाणे ,कोणी भाकर चटनीचा तुकडा दिला तर खुशीने घेणे, बोरवेल तसेच रस्त्यालगतच्या विहीरीतुन पाणी काढुन पिणे असे राज रोस चालत असे, कधी कधी तर मोकाट कुत्री गावात भुंकत मागे लागत मग अशा वेळी हातात दगड घेवून मी फिरत असतो असे सिदगोंडा सांगत होता.त्याच्या सारख्याच अनेक भटक्या आणी विमुक्त जातींच्या समाजातील लोकांची , त्यांच्या अनेक प्रश्नांची स्वातंत्र्या नंतर ही उत्तरे ना त्या 'समाजाला मिळालीत ना आजवरच्या 'सरकारला'
त्यांच्यातल्या त्या समाजातल्या चाळीशीतल्या तरुणाला सही कर म्हण्टले तरी 'मी अंगठा लावतो' असे तो बिंदिक्कत पणे तो सांगतो.
आज 'सावित्रीबाई फुले' आणी 'ज्योतीराव फुले' यांची शिक्षणाची गंगा महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात पोहोचली असे म्हणताना ही अशी उदाहरणे मन सुन्न करुन जातात. आपण भारतीय आज 'मंगळावर' पोहोचलो पण 'बेळगाव' आणी सिमाभागातील लोकांच्या प्रश्नांवर आणी त्यांच्या मुलभुत प्रश्नांपर्यंत पोहोचणे ना 'केंद्र सरकारला' शक्य होत आहे ना 'राज्य सरकारला'. मधल्या मध्ये 'सॅण्डवीच' झाल्या सारखी अवस्था झालेल्या या पुढच्या पिढीतल्या पोरांची जी दुर्दशा आज आहे ती पुढे खुप मोठे 'शाप' घेवून जन्माला येणार यात शंकाच नाही.
आजची सिमाभागातल्या भटक्या आणी विमुक्त समाजातल्या पोरांची निरागसता जावून 'अन्यायाची' भावना इतकी तीव्र होईल की कोणाही राज्यकर्त्याकडे याचे उत्तर नसेल.
'आपल्याच घरी हाल सोसते मराठी'..कवितांच्या ओळी सारख्या आठवत होत्या..
बेळगावच्या सिदगोंडाशी खुप गप्पा मारल्या..धरणाच्या पाटावरचे काम सध्या थंड आहे.म्हणुन इतकी पायपीट करुन पोट भरायला फिरावे लागते..आज सिदगोंडा सारखी अनेक जिवंत उदाहरणे आपल्याच जवळपास असतात फक्त काही बाजारु वर्तमान पत्रात सेलीब्रीटींच्या घरांचे इंटीरीयरचे काम,सुविधा,खाणे पिणे, आणी मुलाखतीचे रकाणे यामुळे दरवेळी कव्हर केलेली एका जातीवंत पत्रकाराची मुलाखत छापुन यायाला..संपादकांची पुढची तारीख तारीखच असते...ही खरी आजच्या पत्रकारीतेची शोकांतीका..
दगडफुलासारखी निरागसता सिदगोंडाच्या नजरेत होती.
तो निघुन गेला..त्याच्या पाठमोरया आकृतीकडे मी नुसताच पाहत होतो..धुळीत पाय माखले होते एव्हाना तो माळरानापर्यंत पोहोचला पण ..मान खाली घालुन त्याचे चालत रहाणे मला कुठे तरी लागले मनाला..हळु हळु त्याची पाठमोरी अंधुकशी आकृती दिसु लागली..माळराना वर पाउस दाटुन आला होता,गडद काळोखा ढग दाटुन आलेला पाउस निष्ठुर पणे हळु हळु बरसु लागला..तो तसाच पावसात हळु हळु पाउले टाकत चालत होता.आता माझे डोळे ओले पाणावले होते...माळरानावर कुठेही आडोसा न्हवता...भिजत भिजत तो तसाच चालत हळु हळु दिसेनासा झाला..त्या दिवशी माळरानावर पडनारा तो निष्ठुर पाउस त्या पोरापुढे खुपच खुजा, कोरडा आणी लहान वाटला.



वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com