postbox media

Saturday 15 August 2020

माळरानावरचे दगडफूल आणि " आंबेडकर

माळरानावरचे दगडफूल आणि " आंबेडकर  "

भारतीय समाज चातुर्वण्यधिष्टीत असून तो अनेक जाती पोटजाती मध्ये विभागला गेला आहे, एक जात दुसऱ्या जाती धर्मापेक्षा श्रेष्ठ समजत असल्यामुळे  जातीय विषमता ही सामाजिक न्याय निर्माण करनाऱ्या  समाजाला छेद देत असते. 

भारतात हजारो वर्षांपासून गावगाड्याबाहेर भटक्या जाती जमातींचे वेगळे विश्व आहे ते मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहे, या जाती उपजीविकेसाठी सतत कुटुंबासह भटकंती करत असतात यांच्याकडे स्वतः:चे गाव, घर, शेती नाही. गावगाड्याबाहेर निमित्तमात्र उपयोगी व्यवसाय करून हा समाज आपली उपजीविका करतो. या समाजाला गावगाड्याचा कोणताही दर्जा नाही किंवा त्यांना गावगाड्यात सामावून घेण्यात आले नाही. यांचे संस्कार, बोली , विधी , वेशभूषा, राहणीमान, स्वतंत्र आणि इतरांपेक्षा भिन्न आहे. कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात अनेकदा अभे राहावे लागते. पारंपारिक रूढी, प्रथा, परंपरेतून हा समाज बाहेर आला नाही. बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय संकल्पनेला योग्य रीतीने अंमलात आणण्यासाठी याच समाजातील तरुण पिढीला पुढे यावे लागणार आहे. 

सिदगोंडा आण्णासो पाटील, सांगली खानापूर तालुक्यातील विटा शहर गावाजवळच्या अतिदुर्गम खेड्यातून पायपीट करत उदर निर्वाह करणा-या ‘भटक्या’ आणि ‘विमुक्त’ जातींचे प्रतीनिधीत्व करणारा चेहरा. बेळगाव, कागल, निपाणी या उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र याला जोडणाऱ्या सीमाभागातील या भटक्या विमुक्तांची कैफियत आजही तशीच आहे. आयुष्य सुंदर आहे तर मग त्याला पाहिले की संपूर्ण भटक्या - विमुक्त यांच्यासाठी हे एकच गाणे का सुचावे " आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?...जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?...कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

देश बदलतोय, राजकारणाचे समाजकारणाचे रंग बदलतायत, पण या ओळी मात्र आजही महाराष्ट्राची भळभळती जखम आहे तशीच आहे. ऊसतोड कामगार, मेंढपाळ, रस्ते,पाट बंधारे निर्मिती कामगार, हंगामी शेती कामगार यांच्या प्रश्नांवर सरकारी दफ्तरी नोंद आहे पण सर्वच प्रश्नांची उत्तरे मात्र व्यवस्थेकडे नाहीत. सिदगोंडा दारो-दारी फिरून महिलांच्या केशशृंगाराच्या, लहान मुला मुलींच्या वेणी फणीच्या गृहपयोगी वस्तु विकायचा, अंगावर पांढरी फाटकी पैरन आणी खाकी चड्डी अंगावर असायची. कडेगावच्या बाजारपेठेत जाण्यासाठी वाटेत कोतीज या गाव खेड्यातून त्याचे जाणे येणे नित्याचे होते, सिदगोंडा आणी त्याची घरची परिस्थीती फार नाज़ुक होती. दुष्काळी भाग त्यात पाण्याची, रोज़गाराची समस्या आ वासून उभी असल्यामुळे सर्वांच्याच पायाला भींगरी लागलेली. उदरनिर्वाहासाठी फिरस्ती झालेला सिदगोंडा घरोघरी जाऊन, स्त्रियांनी वेणी फणी करत साठवून ठेवलेल्या केसांच्या पुंजक्यांच्या मोबदल्यात त्या त्या स्त्रियांना पिना, चाफ, गोंडा, रिबीन, टिकल्या आणि इतर साज व केशशृंगारीक वस्तू द्यायचा. अर्थात हे काम केसावळ आणि इतर केश शृंगारीक, गंगावण, तत्सम कृत्रिम केशनिर्मिती वस्तू तयार करणाऱ्या लघु उद्योजक कंत्राटदाराकडून या पोरांना मिळत असे. हे सर्व जमा करताना, फिरताना पंधरा ते वीस गावे पायी विना चप्पल तुडवून झाली की घराकडे परतीच्या प्रवासाला निघायचे. वाटेत जे जे मिळेल ते ते खाणे आणि पोटापाण्यासाठी फिरणे. मध्येच ऊस, आंबे-करवंदे खाऊन पोट भरणे, तर कधी कोणाच्या शेतातून हरभरा काढून खाणे, कोणी भाकर चटनीचा तुकडा दिला तर खुशीने घेणे, बोरवेल किंवा रस्त्यालगतच्या विहीरीतून पाणी काढून पिणे असे रोज चालत असे. कधी कधी तर मोकाट कुत्री गावात भुंकत मागे लागत मग अशा वेळी हातात दगड घेवून फिरावे लागते, काय करणार ?  त्या दिवशी सिदगोंडा ला मी कुतूहलापोटी बोलते केले, भटक्या आणि विमुक्त जातींच्या समाजातील लोकांची, त्यांच्या अनेक प्रश्नांची स्वातंत्र्यानंतरही उत्तरे ना त्या ‘समाजाला’ मिळालीत ना आज पर्यंतच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेला. हाताच्या बोटावर मोजण्याचे अपवाद सोडले तर या समाजातल्या चाळीशीतल्या तरूणाला कागदपत्रांवर ‘मी अंगठा लावतो’ असे ऐकताना पाहिले की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नक्की हाच का ?
आपण भारतीय आज ‘मंगळावर’ पोहोचलो पण विटा, सांगली, ‘बेळगाव’ आणि सिमाभागातील लोकांच्या मुलभूत प्रश्नांपर्यंत पोहोचणे इथल्या व्यवस्थेला अजूनही शक्य होत नाही. सॅण्डविच झाल्यासारखी अवस्था झालेल्या या पिढीतल्या मुलांची जी दुर्दशा आज आहे ती मोठे प्रश्न घेऊन भविष्यात उभे ठाकू शकते. सिदगोंडाशी गप्पा झाल्या, धरणाच्या पाटावरचे काम सध्या थंड म्हणून इतकी पायपीट करून पोट भरायला फिरावे लागते, शाळेत जातो, अभ्यासाची प्रचंड आवड, कामामुळे एका गावात शाळा सातत्य ठेवता येत नाही, तीन चार शाळा बदलाव्या लागल्या परिणाम अभ्यास आणि एकाग्रतेवर होतो, आई वडील अशिक्षित त्यामुळे घरातून शिक्षणाला तितकासा पाठींबा पण नाही. तरी जिद्देने शिक्षण घेतोय.
       औषधी गुणधर्म असल्यामुळे माळरानावर उगवलेल्या दगडफूलाचा पाला जखमेवर चोळला की जखम लवकर बरी होते, यावेळी दगडफुलासारखी निरागसता सिदगोंडाच्या नजरेत होती. आजू बाजूच्या चार घरातून काहीच न मिळाल्यामुळे तो निघून गेला. त्याच्या पाठमो-या आकृतीकडे मी नुसताच पाहत होतो, धुळीत पाय माखले होते, आता तो माळरानापर्यंत पोहोचला होता. आज शाहू,फुले,आंबेडकर यांच्या जयंत्या मोठ्या दिमाखात साजऱ्या होतात त्यामागे सामाजिक न्याय, समता, बंधुत्व  या पेक्षा राजकीय मतांची गोळाबेरीज जास्त दिसते. या समाजात बाबासाहेबांची शिकवणुक कृतीत असल्यामुळेच की काय इतर समाजांविरुद्ध  ईष्येपोटी रस्त्यांवर मिरवणुका नसतात, मोठे ढोलताशे नसतात, डीजे नसतो, नाच गाणे व्दिअर्थी गाणी नसतात, इतर समाजाना कमी लेखण्यासाठी  रंगाच्या, झेंड्यांच्या उधळणीचा अहंकारी बडेजाव नसतो.
सिदगोंडाच्या झोपडीत आंबेडकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी होते, बाबासाहेबांच्या तसवीरीसमोर एक दिवा लागतो, मेहनतीच्या स्वाभिमानाच्या पैशातून. शिक्षण आणि समाज शिक्षण यातून दिवा लागला की घराघरातून निर्माण होणाऱ्या मंद प्रकाशातून संपूर्ण समाजाला ऊर्जा मिळते एक नवा अध्याय निर्माण करण्याची.

असा अध्याय निर्माण व्हावा, हीच ऊर्जा कायम टिकावी, प्रोत्साहन मिळावे म्हणून पूर्वीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जात आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांनी त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार, १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

वैभव जगताप
लेखक
www.postboxindia.com

No comments:

Post a Comment