postbox media

Thursday, 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मेथी थेपले




नमस्कार 


बाजार मध्ये मेथीच्या जुड्या खूप प्रमाणात बघायला मिळतात चला तर आज आपण बघुया मेथीचे थेपले

साहित्य:
२वाटी कणिक
१/२ वाटी बेसन
१वाटी हिरवी मेथी ची बारीक चिरलेली पाने
थोडी कोथींबीर
१ चमचा लसुण हिरवी मिरची पेस्ट
१बारीक चिरलेला कांदा
१चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा हळद
१/२चमचा जिरं
पाव चमचा हिंग
१चमचा धणे पावडर
१चमचा तीळ
१चमचा ओवा
१/२ वाटी दही
मीठ
तेल

कृती :
१)सगळे मिश्रण एकत्र करून पाण्याने भिजवुन घ्यावे .
२) १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे
३) लहान पोळी प्रमाणे लाटुन घ्यावी आणि तेल लावून शेकून घ्यावी.
मेथीचे थेपले साखर घातलेल्या दह्या सोबत ,लोणच्या सोबत खाता येईल.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - कालव्याचे सुकं





नमस्कार 


आज आपण बघुया कालव्याचे सुकं

साहित्य:-
कालव १ ते दोन वाटे
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
१/२ चमचा हळ्द
२ चमचे मालवणी मसाला
३-४ कोकम
१/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
तेल
मीठ

कृती:
१)प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची
२) कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनीटांनी त्यात कोकम घाला व मिठ घाला. जरा परतुन कोथिंबीर घाला थोडावेळ वाफेवर ठेउन गॅस बंद करा.

टिपा:
१कालव समुद्राच्या खडपातील दगडाला चिकटलेल्या कवचीत असतात. कोयत्याने टोचून कवचीचे आवरण फोडून आतील कालव काढतात. त्यामुळे त्याला चिकटलेली कच राहते. म्हणून कालव व्यवस्थित साफ करावित. एकादा कच राहीला तर दाताखाली येतो.
२)कालव मोठ्या आकाराचीही येतात. ती कापुन घ्यावी लागतात.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - केळ्याचे शिकरण





नमस्कार 


लहान मुले फळे किंवा केळ खायला कंटाळा करतात. केळ्याचे शिकरण हे झटपट बनवता येते, मुलांना भूक लागलीतर लगेच चपाती बरोबर सर्व्ह करता येते. पिकलेले केळ हे चवीला मधुर, थंड, रुची उत्प्प्न करणारे आहे. दुध व केळे हे लहान मुलांचा पूर्ण आहार आहे. जी मुले अशक्त आहेत त्याच्या साठी केळ्याचे शिकरण हे उत्तम आहे.

साहित्य:
६ केळी (पिवळी पिकलेली)
१/२ लिटर दुध
१/४ चमचा वेलचीपूड किंवा व्हेनिला इसेन्स
१/४ वाटी साखर किंवा गोड हवे असेल तर अजून थोडी

कृती:
१)चांगली पिकलेली पिवळी केळी घेवून त्याची साले काढून त्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
२)एका मध्यम आकाराच्या भांडे घेवून त्यामध्ये चिरलेली केळी, दुध, साखर, व वेलचीपूड किंवा व्हेनिला इसेन्स घालून चांगले एकजीव करा.
केळ्या चे शिकरण तयार

टीप:-
१) तुम्हाला शिकरणा मध्ये अजून वेगळे बनवायचे असेल तर दुधा ऐवजी नारळाचे दुध, साखरे ऐवजी गुळ व वेलची पावडर सुद्धा घालून शिकरण छान होते.






मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - खेकडा मसाला किंवा चिंबोरी चे कालवण





नमस्कार


 
आज आपण बघुया खेकडा मसाला किंवा चिंबोरी चे कालवण

साहित्य:-
४-५ खेकडे/ चिंबोरी
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा बारीक चिरलेला
२ चमचे मालवणी मसाला
१/२ चमचा हळद
मीठ
३-४कोकम
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन वाटावे
१ चमचा गरम मसाला.
थोडी कोथिंबिर
तेल

कृती:-
१)चिंबोरे साफ करुन घ्यावे. साफ करुन म्हणजे चिंबोरीचे दोन मोठे नांगे काढुन घ्यायचे, बाकीच्या नांग्यांचे वाटुन ते गाळून त्याचे पाणी घ्यायचे त्यामुळे रश्शाला दाटपणा येतो पण हे ऑप्शनल आहे. नंतर चिंबोरे मधुन कापुन त्यातील काळी पिशवी काढून टाकायची. जर चिंबोरे छोटे असतील तर आख्खे टाकले तरी चालतील.
२)एका पातेल्यात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हळद, मालवणी मसाला, चिंबोरे, मोठे नांगे टाकुन चिंबोरे बुडतील एवढ पाणी घालावे.
३)आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, कोकम, मीठ, कोथिंबीर टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा. चिंबोरे शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणुन मध्यम काचेवर १५ मिनीटेतरी शिजु द्यावे.

टिपा:
१)चिंबोर्‍यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्‍यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अ‍ॅलर्जीहई असते चिंबोर्‍यांची. पण लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच. शिवाय ताटात हा पसारा होउन दोन हात खाण्यासाठी वापरावे लागतातच.
२)चिंबोर्‍यांचे अजुन सुप, सुके करता येते. तसेच पिठ भरुन कालवणही करतात.
चिंबोर्‍या घेताना कडक बघुन घ्यायच्या. जर चिंबोरे दाबल्यावर आत जात असतील तर ते पोकळ असतात. ३)भरलेल्या चिंबोर्‍यांमध्ये लाख (गाबोळी मिळते) ती मिळाली म्हणजे सोने पे सुहागाच
४)दिवाळीच्या आसपास खाडीत तसेच खाडीलगतच्या शेतात छोटी छोटी चिंबोरी मिळतात त्यांना पेंदुरल्या म्हणतात. ह्या पेंदुरल्या आतमध्ये पुर्ण लाखेने भरलेल्या असतात. लाख म्हणजे ह्यांची गाबोळी.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - गव्हाची खीर





नमस्कार 


 आज आपण बघुया पौष्टिक अशी गव्हाची खीर

साहित्य :-
पाव किलो गव्हाचा जाडसर रवा
पाव किलो गूळ
पाव लिटर दूध
पाव तुकडा जायफळ
२ चमचे खसखस
४ वेलदोडे
४-५ काड्या केशर
२ चमचे बदाम पिस्त्याचे काप
अर्धी वाटी खवलेला नारळ
२-३चमचे तूप

कॄती :
१)गव्हाचा रवा अर्धा लिटर पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्या होईपर्यंत शिजवावा.
२)गार झाल्यावर त्यात गूळ, खोबरे, वेलची पूड, खसखस पूड, केशराच्या काड्या,जायफळ पूड,बदाम पिस्ता चे थोडे काप घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे. गूळ रव्यात मिसळेपर्यंत म्हणजे साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवल्यानंतर हे मिश्रण खाली उतरवून त्यात दूध घालावे. ३)सजावटी साठी वरून ड्रायफ्रूट चे काप आणि तूप पसरावेत.

ही खीर चवीस उत्तम व पौष्टीक आहे.

टिप:-
१) शक्यतो ही खीर गुळा मध्ये बनवावी
काळा गुळ असेल तर उत्तम
२)खसखस आवडत असेल तर थोडी भाजून घालावी
३)ही खीर खूप पौष्टिक असते बाळंतीणीला सुद्धा देऊ शकतो
४) सहसा ही खीर खपली गव्हाचे करतात ते जर नाही मिळाले तर साध्या गव्हाची पण खीर बनवू शकत.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - लसूणशेव




नमस्कार,


आज आपण बघुया लसूणशेव

साहित्य:
२ १/२वाटी बेसन
१/२ वाटी तेल
१/४ वाटी लसूण पेस्ट
१/२ पेला पाणी
२ चमचे हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा ओवा
१/२ चमचा पांढरी मिरपूड
मीठ
तळणासाठी तेल

कृती:
१)एका परातीत बेसन, पांढरी मिरपूड, आणि मीठ एकत्र करून चाळून घ्यावे.
२) १/२पेला तेल कडकडीत तापवावे. आणि बेसनाच्या मिश्रणात घालावे. चमच्याने एकजीव करून घ्यावे.
३) तवा गरम करावा आणि गरम झाला कि बंद करावा. त्यात ओवा अगदी हलकेच भाजून घ्यावा. खलबत्त्यात भरडसर कुटून घ्यावा.
४) १/२ पेला गरम पाणी घ्यावे. त्यात लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, आणि ओवापुड घालून मिक्स करावे. लसूण हाताने चुरडावी म्हणजे लसणीचा स्वाद पाण्यात पुरेपूर उतरेल. हे पाणी बारीक जाळीच्या गाळण्यातून गाळून घ्यावे.
५) हे पाणी बेसनामध्ये हळू हळू घालावे आणि घट्टसर पण चिकट असे मिश्रण बनवावे.
६) शेव पाडायच्या सोऱ्याला आतून तेलाचा लावून घ्यावा. बेसनाचे भिजवलेले पीठ यामध्ये घालावे.
७) कढईमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाले कि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. प्रेस करून शेव पाडावी. शेव पाडायची योग्य पद्धत म्हणजे शेव गोलाकार पाडावी. म्हणजे तेलात बाहेरून वर्तुळाकार फिरवत एक फेरा झाला कि तो लगेच आतमध्ये चक्र पूर्ण करावे. कढई जेवढी मोठी तेवढे फेरे करावेत. शक्यतो शेव एकावर एक अशी पाडू नये, कच्ची राहते आणि मऊ पडते.
८) एक बाजू तळली गेली कि हलकेच पलटून दुसरी बाजू तळावी. अशाप्रकारे सर्व भिजवलेल्या पिठाची शेव बनवावी.
९) शेव तळली कि टिश्यू पेपरवर काढून ठेवावी. म्हणजे अधिकचे तेल निघून जाईल. गार झाले कि हाताने चुरडून हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

टीपा:
१) मिरची पेस्ट ऐवजी २ टीस्पून लाल तिखट वापरले तरीही चालते. पण तिखटाचा रंग खूप भडक असेल तर शेवेचा रंग लालसर होतो.
२) लसूण, ओवा, किंवा मिरची बेसनात डायरेक्ट घालून शेव पाडू नये. ओवा, लसूण यांचे कण शेव पडायच्या जाळीत अडकून शेव नीट पडत नाही. म्हणून पाण्यात सर्व घालून पाण्याला त्याचा स्वाद द्यावा आणि हे पाणी पीठ भिजवायला वापरावे.
३) पाण्याचे प्रमाण काही टेस्पून कमी जास्त होवू शकते. त्यामुळे बेताबेताने पाणी घालावे. मिश्रण घट्ट आणि चिकट झाले पाहिजे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पुरणपोळी





नमस्कार 



आज आपण बघुया पुरणपोळी

साहित्य :-
३ वाट्या हरभरा डाळ
३ वाट्या चिरलेला गूळ
१ वाटी साखर
अर्धे जायफळ
५-६ वेलदोडे
३ वाट्या कणीक
३ चमचा मैदा
चिमुटभर मीठ
पाऊण वाटी तेल
तांदळाची पिठी


कृती :-
१)हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी.
२) शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. ह्या पाण्याला पुरणाचा कट म्हणतात. पुरणपोळी बरोबर त्याचीच आमटी करतात. पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते.
३)डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. शिजवताना प्रथम पातळ होते व नंतर झाऱ्याला घट्ट लागू लागते.
४)पुरणयंत्राला बारीक जाळीची ताटली लावावी व शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
५)कणीक व मैदा चाळणीने चाळून घ्यावा व चिमुटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक सैलसर भिजवावी.
२ तास कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली माळवी. पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा. कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
६)वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. तांदळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
७)पोळपाटावर पिठी घेवून हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मनचाव सूप





नमस्कार

आज आपण बघुया मनचाव सूप

साहित्य :
१ टेस्पून तेल
५ मोठ्या लसूण पाकळ्या, एकदम बारीक चिरून
१ इंच आल्याचा तुकडा, सोलून बारीक चिरून
१ ते २ हिरव्या मिरच्या
१ कप भाज्या,एकदम बारीक चिरलेल्या - भोपळी मिरची, गाजर, मश्रुम, पाती कांद्याचा पांढरा भाग
३ कप व्हेजिटेबल स्टॉक
१ टेस्पून सोया सॉस
१/२ टिस्पून व्हिनेगर
१/२ टेस्पून टोमॅटो केचप
१/२ टेस्पून मॅगी चिली मसाला सॉस
१ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
२ चिमटी व्हाईट पेपर पावडर
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी पाती कांद्याचा हिरवा भाग
१/४ कप शेवया (ऐच्छिक).

कृती :
शेवया:-
चायनीज नुडल्स पाण्यात उकळवून साधारण ८० ते ९० % शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या शेवयांपैकी अर्ध्या शेवया तेलात कुरकूरीत होईस्तोवर तळाव्यात.
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण ४ ते ५ सेकंद परतावे. मिरची घालून परतावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात. मिठ घालावे.
२) भाज्या अर्धवट शिजल्या कि ३ कप वेजिटेबल स्टॉक घालावा. एक उकळी आली कि १ टेस्पून सोया सॉस (light soy sauce), टोमॅटो केचप आणि मॅगी चिली मसाला सॉस घालून उकळवावे. चव पाहावी. लागल्यास मिठ घालावे. व्हाईट पेपर पावडर घालावी.
३) १ टेस्पून कॉर्न स्टार्च १/४ कप पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालावे. २-४ मिनीटे उकळी काढून व्हिनेगर घालावे.
शेवया वापरणार असाल तर फक्त शिजवलेल्या शेवया घालाव्यात. सर्व्ह करताना बोलमध्ये आधी सूप घालावे, त्यावर बारीक चिरलेला पाती कांद्याचा हिरवा भाग आणि तळलेल्या शेवया घालाव्यात.

टीप:
१) जर अगदीच व्हेजिटेबल स्टॉक नाही मिळाला तर साधे पाणीसुद्धा वापरू शकतो.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - दुधी हलवा




नमस्कार

आज आपण बघुया दुधी हलवा

साहित्य:
१ किलो कोवळा दुधी भोपळा किसलेला
२ चमचे साजूक तूप
१ १/२ पेला दुध
३/४ पेला खवा (आवडत असल्यास थोडा जास्त घेतला तरी चालेल)
३/४ पेला साखर
१/४ चमचा वेलचीपूड
६-७ बदाम
१०-१५काजू तुकडे
१०-१२ चारोळ्या
१० बेदाणे आवडीनुसार

कृती:
१) दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे. हे पाणी सूप किंवा आमटी मध्ये वापरता येईल.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
३) दुध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दुध घालावे. खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर कालथ्याने फोडाव्यात.
४) खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि एकजीव करून घ्यावे . आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

टीप:
१) जर घरात उरलेले पेढे असतील तर त्याची पावडर करून खवा म्हणून वापरू शकतो, फक्त साखरेचे प्रमाण कमी करावे  

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - कटाची आमटी




नमस्कार 


आज आपण बघुया कटाची आमटी

साहित्य:
३ वाटी चणा डाळ शिजवलेले पाणी
मसाला -
( २ चमचे सुकं खोबरं+ १/४ चमचा जिरे+ २ मिरी+१ लवंग+१/२" दालचिनीचा तुकडा) भाजून बारीक वाटून घ्या.
२ १/२ चमचा चिंचेचा कोळ
३ चमचे गुळ
१ १/२ चमचा लाल तिखट
१ १/२ चमचा गोडा मसाला
१/४ चमचा हळद
फोडणीसाठी- १/२ चमचा मोहरी,१/४ चमचा हिंग, ७-८ कढीपत्ता

कृती:
१)डाळीच्या पाण्यात (कटात) भाजून वाटलेला मसाला घाला.
२) चिंचेचा कोळ, गुळ, लाल तिखट,गोडा मसाला, हळद आणि मीठ घाला.
३)आमटी चांगली उकळवा. फोडणीच्या कढईत तेल चांगले गरम करा. तेल तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर मग कढीपत्ता आणि हिंग घालून आमटीला फोडणी द्या.
४)कटाची आमटी पुरणपोळी बरोबर करण्याची पद्धत आहे.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/