नमस्कार
आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत
व्हेज बिर्याणी
साहित्य :
★भातासाठी-
१ १/२पेला बासमती तांदूळ
३ पेले पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलची, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी,१चक्री फूल)
★रस्सा भाजी साठी -
मसाला वाटण १ :- २-३चमचे आलं लसूण पेस्ट , २ हिरव्या मिरच्या, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा खसखस
★मसाला वाटण २ :- १ चमचा धने, १ चमचा शहाजिरे / जिरे, ३-४ लवंगा, ५-६ काळी मिरी, १' दालचिनीचा तुकडा
तळण्यासाठी-, ३-४उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू
★भाज्या -१ बारीक चिरलेला कांदा, फ्लॉवरचे ६-७ तुरे, १/४ वाटी मटार, २ बटाट्याच्या चोकोनी फोडी
१/४ वाटी उभे चिरलेले गाजर, १/४ वाटी सिमला(भोपळी) मिरचीचे चौकोनी तुकडे, १/२वाटी फरसबी चिरलेली
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ तमालपत्र
३ चमचे तेल
मीठ चवीप्रमाणे
केवडा इसेन्स
केशर चिमुटभर आणि ४ चमचे दुध
कृती :
१)सर्व प्रथम तांदूळ १० -१५मिनिटे आधी धुवून ठेवा. २)एका पातेल्यात २ चमचे
तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ
घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट
(इथे २ १/२ पेला ) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात
पूर्ण शिजू दे.
३) भात पूर्ण शिजला कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे. म्हणजे नंतर थर करताना मोकळा होईल.
४) एकीकडे कढईत तेल गरम करा. तेलात काजू तळून घ्या.काजू लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
५) नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत तळून
घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर रस्सा
भाजी साठी त्याच्यातच ठेवून द्या.
६)खसखस गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे ती शिजेल.
७)मसाला वाटण no.१ मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
८) मसाला वाटण no.२ ची बारीक powder करून घ्या.
( तयार गरम मसाला पावडर १/४ चमचा वापरली तरी चालेल.)
९)एका पातेल्यात तळणीचे तेल घ्या त्यात तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
१०)मग मसाला वाटण no.१ घालून परता. खमंग वास सुटला कि. मसाला वाटण no.२ घालून परता.
११) १-२ मिनिटे परतल्यावर हळद मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
१२) मग बटाटा ,फ्लॉवर, गाजर, मटार, सिमला मिरची अनुक्रमे घालून १ १/२ कप पाणी घाला. वरून झाकण ठेऊन भाज्या छान शिजू द्या.
१३) रस्सा तयार झाला कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर खलून ठेवा.
१४) नंतर पातेल्यात सर्वात खाली भाताचा थर करा.त्यावर तळलेला कांदा, काजू
घाला. वरती भाजीचा थर करा. मग परत भाताचा थर.वरती कांदा काजू , वरती भाजीचा
थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला
कांदा,काजू , कोथिंबीर घालून सजवा.
१५)थरांना चमच्याच्या दांड्याने
वेगवेगळ्या जागी ३-४ छोटी भोकं पाडा. त्यातून केशरी दुध आणि १ झाकण केवडा
इसेन्स घाला. भोक बुजवा आणि झाकण ठेऊन १-२ वाफा काढा.
१६)बिर्याणी उभा डाव घालून. थर न मोडता वाढा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया
सुरणाचे काप
साहित्य
पाव किलो सुरण
४-५ चमचे रवा
३-४ चमचे तेल
४-५कोकम
पाणी
★मुरवण्यासाठी:
१ छोटा चमचा लाल तिखट
१/२ छोटा चमचा मिक्स मसाला
चिमुटभर हळद
पाव छोटा चमचा मीठ
२ छोटे चमचे तांदुळाचे पीठ
कृती:-
१)हाताला तेल लाऊन, सुरणाची साल काढून लांबट फोडी किंवा पातळ काप करून घ्याव्यात.
२)एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पाणी उकळत ठेवावे.त्यात सुरणाचे काप घालावेत एक वाफ आली की कोकम घालून उकडून घ्यावे
३)एक भांड्यात सुरणाचे काप काढून घ्या त्यात लालतिखट,मिक्समसला,हळद,मीठलावून एकजीव करून घ्या आणि २०मिनिटे बाजूला ठेवा
४)रव्या मध्येये घोळवून काप तळून घ्या
५)ह्यात अजून एक पद्धत अशी आहे की रव्या मध्ये तिखट,मीठ, मिक्समसला, हळद,तांदुळ पिठएकजीव करून त्यात घोळवून तळून घ्यावे
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया टोमॅटो सूप
साहित्य:
१/२ किलो टोमॅटो
१ चमचा चिरलेलं आलं
१ चमचा चिरलेला लसूण
१ चमचा आख्खा गरम मसाला
२ तमालपत्र
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जीरे
१ चमचा साखर (आवडीनुसार)
१ चमचा तेल
२ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
कृती:
१)टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याला बारीक चिरून घ्या
२)टोमॅटो आलं, लसूण, हिरवी मिरची कापून गरम मसाला घालून शिजवून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी आणि तमालपत्र घालून उकळत ठेवा.
३)मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे टोमॅटो शिजेपर्यंत वाफवून घ्या.
४)मिश्रण सूप गाळण्याच्या भांड्यातून गाळून घ्या.
५)भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे घालून तडतडू दया. त्यात गाळलेले टोमॅटोचे मिश्रण घाला त्यात चवीनुसार मीठ घाला.
६)हे मिश्रण उकळत ठेवा आणि जास्त आंबट वाटल्यास त्यात साखर घाला.
७)बारीक चिरलेली कोथिंबीर वापरून सजवा आणी गरमागरम सर्व्ह करा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया झटपट रवा डोसा कसा बनवायचा
साहित्य:-
१ वाटी बारीक रवा
१ वाटी तांदळाची पिठी
१ वाटी मैदा
१ वाटी आंबट दही
तेल
मीठ
कृती:-
१)डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.
२)त्यात २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन आणि चवीला मिठ घालावे.
३)डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ
धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर
खाण्यास द्यावा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
दिवाळीत रोज गोडधोड खाऊन आता कंटाळा आला
चला तर आज आपण बनवूया चिकन लॉलीपॉप
साहित्य :
८ चिकन लॉलीपॉप स्टिक (ह्या स्टिक चिकनच्या दुकानात मिळतात.)
२ अंडी
६ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
१/४ चमचे मिरी पावडर
१/४ चमचे गरम मसाला
१/२ चमचे चिली सॉस
१/२ चमचे सोया सॉस
५० ग्रॅम मैदा
१ चमचा आले-लसून पेस्ट
खायचा लाल रंग (चिमुटभर)
१/२ वाटी पाणी
१/२ चमचा मीठ
तेल तळण्यासाठी
कृती:-
१)चिकन लॉलीपॉप स्टिक १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. त्यात १/२ चमचा मीठ घाला.
२)एका भांड्यात हिरव्या मिरचीचे वाटण,सोया सॉस,चिली सॉस, आलं लसूण पेस्ट
,अंडी,मैदा,मीठ,खायचा रंग,,गरम मसाला आणि लागल्यास पाणी हे साहित्य एकत्र
करून एकजीव करून घ्या. त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करा.
३) एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवा.त्यात चिकन लॉलीपॉप स्टिक वरील मिश्रणात बुडवून तेलात टाळून घ्या.
४) गरम-गरम शेजवान सॉस बरोबर सर्व करा.
टीप :
१)ह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर १/४चमचा अजिनोमोटो पण घालू शकतात
मी अजिनोमोटो वापरला नाही आहे .
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत की ती सगळ्यांच्या आवडीची आहे मिठाई मधली राणी काजूकतली .
चला तर आपण बघुया काजूकतली
साहित्य:
सव्वा पेला काजूची बारीक पूड
१/२ पेला साखर
१ चमचा तूप
१/४ चमचा वेलचीपूद
पाणी
चांदीचा वर्ख सजावटीसाठी
कृती:
१) एका नॉनस्टिक पॅन मध्ये पाव पेला पाणी घ्यावे त्यात साखर घालून एकतारी पाक बनवावा
२) पाकामध्ये काजूची पावडर घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या
३) मिश्रण जरा आळले कि त्यात तूप आणि वेलचीपूड घालावी आणि सगळे मिश्रण अळून द्यावे.
४) पोळपाटाला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर
पोळी लाटावी. चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.
टीपा:
१) काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केलेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.
२) काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम
दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध
मिश्रणात घालावे.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया गुलाबजाम
साहित्य:
★२५० ग्रॅम गुलाबजामचा खवा
★साखरेचा पाक बनवण्यासाठी
दिड पेला साखर
सव्वा पेला पाणी
१/२ टिस्पून वेलचीपावडर
★इतर साहित्य
तळण्यासाठी तेल किंवा तूप
१ चमचा मैदा
गरजेप्रमाणे दुध
चिमूटभर बेकिंग सोडा
कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत
बेकिंग सोडा घालावा. निट एकजीव करावे. किंचीत दुध शिंपडून मळून घ्यावे.
लागल्यास अगदी थोडे तूप हाताला लावून मध्यम मळावे. ओल्या कपड्याने हा गोळा
झाकून ठेवावा.
२) दिड पेला साखर, सव्वा पेला पाणी एकत्र करून उकळत
ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा.त्यात वेलचीपूड घालावी. पाक तयार होत
असतानाच मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर
असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
३) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम आचेवर गुलाबजाम तळून घ्यावेत .
४) साखरेच्या पाकात हे गुलाबजाम सोडावेत .
गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे. शक्यतो आदल्या रात्री करून मुरवल्यास व्यवस्थित मुरतात.
टीप:
१) काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोज इसेंस घालावा.
२) मैद्याऐवजी आरारूट पावडर किंवा कॉर्न फ्लोर वापरले तरी चालते.
३) गुलाबजाम तळताना तेलाचे तापमान फार महत्त्वाचे असते. जास्त गरम तेल
असेल तर गुलाबजामला लगेच लालसर रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. आणि पाकात
टाकल्यावर न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही. त्यामुळे सुरूवातीला एकदोन
गुलाबजाम टाकून तापमानाचा अंदाज करून घ्यावे.
४) गुलाबजामसाठीचा पाक खुप घट्ट करू नये त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये निट मुरत नाही.
५) गुलाबजामसाठी वेगळा रवाळ असा खवा मिळतो तो वापरावा
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया कलाकंद
साहित्य:-
१लिटर दुध
१/२ चमचा सायट्रिक अॅसीड किंवा एका लिंबाचा रस
१ १/२ ग्रॅम खवा
३/४ वाटी साखर (साधारण १५० ते १७५ ग्रॅम)
१/२ चमचा वेलची पुड
पिस्त्याचे पातळ काप
कृती:
१) दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात
चिमटीचिमटीने सायट्रिक अॅसीड घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती
कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.
२) गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार
पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक अॅसीडची आंबट चव आणि
वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
३) खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत
ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी
पनीर आणि वेलची पुड घालावी.
४) पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण
आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण
एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या
पाडाव्यात.
वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.
टीपा:
१) आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.
३) ३/४ कप साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर २ ते ३ चमचे साखर वाढवावी.
४) मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
गोड तिखट तेलकट आणि तुपकट या फराळाच्या चवीचा आस्वाद ज्यांची पथ्य पाणी
चालू आहे त्यांना घेता येत नाही म्हणूनच आजची रेसिपी खास पथ्यकरणाऱ्यांसाठी
आहे आणि लहान मोठ्यानं ही आवडेल अशी झटपट शुगर फ्री रेसिपी खजुराचे लाडू
साहित्य:
१ वाटी खजूर बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर काढून घेणे)
१/२ वाटी बदाम,पिस्ता,काजू भरड काढलेली
१/२ वाटी किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
१ चमचा तूप
१ चमचा खसखस
कृती:
१) खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक
पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर
वाटलेले बदाम, पिस्ता, काजू,खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
२)सगळे मिश्रण एकजीव झाले कि ताटात काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
शक्यतो लाडूचा आकार लहान असावा.कारण खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.
टीपा:
१) साध्या खजूराप्रमाणेच काळ्या खजूराचेही अशाप्रकारे लाडू करू शकतो.
२)लाडूच्या ऐवजी त्याचे रोल पण करू शकतो
३) तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया एक पारंपारीक पदार्थ या पदार्थांशिवाय दिवाळी चा फराळ हा अपूर्णच वाटतो .गोड खुसखुशीत असे अनारसे.
चला तर बघुया अनारसे कसे बनवायचे .
साहित्य:
१ वाटी तांदूळ
१ वाटी किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल
कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर किंवा सुती कपड्यावर घालून
वाळवून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्या नंतर बारीक चाळणीमधून
चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक
तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून
ठेवावा.प्लॅस्टिक चा हवा बंद डबा वापरावा.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ
बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे
गोळे करावे.एक प्लॅस्टिक ची पिशवी घेऊन त्यावर खसखस घालावी आणि खसखशीवर हे
पिठाचे गोळे पुरीप्रमाणे लाटावे किंवा थापावेत . हि पुरी तळताना खसखस
असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू
शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा
आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही
व गोल राहिल.
६) बऱ्याच वेळा अनारसे तळताना तो फसफसतो अशा वेळे ते कणिक परत बंद करून ठेऊन द्यावे काही दिवस.
हे पीठ ६-७महिने सहज रहाते
७) अनारसे बारीक आचेवर तळून घ्यावे आणि झाऱ्यात उभे ठेवावे.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/