नमस्कार
आज आपण बघुया सुकट वांग बटाटा
साहित्य:
१/२ वाटी सुकट / सुका जवळा
२कांदे बारीक चिरलेले
७- ८ पाकळ्या ठेचलेला लसूण
१वांग्याच्या मध्यम फोडी
१ बटाटाच्या मध्यम फोडी
३ चमचे मालवणी मसाला
१/२ चमचा हळद
३-४ कोकम
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
मीठ
पाणी
कृती:
१)सुकट निवडून व्यवस्थित धुवा आणि १५ मिनीटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि वापरण्यापूर्वी घट्ट दाबून पिळुन पाणी काढुन टाका.
२)पॅनमध्ये किंव्हा छोट्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण व कांदा घालून गुलाबी रंगावर परतावे.
त्यात हळद घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मसाला व घट्ट दाबून पिळुन घेतलेली सुकट टाका आणि जरा वेळ परता.
३)त्यात वांगी, बटाटा, मीठ आणि कोकम टाका.
ज्या प्रमाणात रस्सा हवा त्यानुसार थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करावे
आणि कुकरच्या १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. बाहेर शिजवणार असाल तर
बटाटा शिजल्यावरच कोकम टाकावे.
वरून कोथिंबीर घालावी
टीप:
१)जर हि सुकट कुकरमध्ये करणार नसाल तर वांग-बटाटा शिजत आल्यावरच कोकम किंव्हा इतर आंबट घाला. नाहीतर बटाटा शिजणार नाही.
२)या भाजीत कच्चे/हिरवे टोमॅटो पण यात छान लागतात.
येथे मी सुकट वापरली आहे परंतु आम्ही अश्या प्रकारचा रस्सा सुकट, अंबाडीची सुकट, सोडे किंव्हा ताजी कोलंबी वापरून सुद्धा करू शकतो.
३)सुकट वांगी, घेवडा, वाल पापडी, कांद्याची पात, बारीक मेथी इत्यादी भाज्या घालून केली जाते.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया मुगाची खिचडी कशी बनवायची
साहित्य'-
१ पेला तांदूळ
१/२ वाटी मूग डाळ
३पेले गरम पाणी
फोडणीसाठी:-
१/२छोटा चमचा राई
१/४ चमचे जिरे
१ चिमूटभर हिंग
१/४ चमचा हळद
१/४ चमचा लाल तिखट
१/२ वाटी मटार
१ चमचा गोडा मसाला
पाणी
तूप
मिठ
तेल
कृती:
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
२) लहान कूकरमध्ये किंवा पातेल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे,
हिंग, हळद, आणि तिखट घालून फोडणी करावी. नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे.
साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
३)
डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी
घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी. लागल्यास
मिठ, किंवा लाल तिखट घालावे.
४) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण
लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि
कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
टीप:
१) मूगाच्या पिवळ्या डाळीऐवजी, मूगाची सालासकट डाळ किंवा तूरडाळ, मसूर डाळही वापरता येते.
२)खिचडी जर मऊ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे व फडफडीत हवी असल्यास किंचीत कमी करावे.
३) तांदूळ चांगले भाजल्याने खिचडीचा गोळा होत नाही आणि शितं वेगवेगळी राहतात. भाजताना फक्त ते जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) मटारऐवजी बटाटा, फ्लॉवर, भोपळी मिरची, कांदा, गाजर इत्यादी घालू शकतो.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया मोरी मसाला /मुशीचे मसाला .
बेबी शार्क म्हणजेच मुशी किंवा मोरी असं या मशाल बोललं जाते
साहित्य :-
२-३ मुशी साफ करून बारीक तुकडे केलेले
१/२ वाटी नारळ
२ मोठेे कांदे
(१- १/२ उभा चिरलेला वाटाणा साठी आणि १/२ फोडणीसाठी)
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ वाटी कोथिंबीर
५-६ लसूण पाकळी
१/२ इंच आल्याचा तुकडा
१/२ चमचा आलं
२-३चमचे मालवणी मसाला
१चमचा धणे
३-४कोकम
पाणी
तेल
कृती:-
१) मुशी २-३ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावी त्याला थोडं मीठ,हळद आणि मसाला लावून १०-१५ मिनिटे मुरत ठेवावे
२) एका पॅन मध्ये १ चमचा तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर होइपर्यंत भाजा
त्यात खोबरं घालून चांगलं खरपूस भाजून घ्यावे त्यात धणे घालावे आणि थोडं
पाणी घालून वाटून घ्यावे
३)मिरच्या,लसूण ,आलं आणि कोथिंबीरीच हिरवं वाटण करून घ्यावे
४) एका भांड्यात २-३ चमचे तेल घ्यावे त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा तो लाल झाला की त्यात हिरवं वाटण घालावं आणि परतुन घ्यावं
५)मालवणी मसाला आणि हळद घालावी आणि परतावे
आणि लगेच खोबऱ्याचे वाटण घालावे आणि पालटून घ्यावे त्या मुशी आणि पाणी घालावे
साधारण एक उकळी आलीकी त्यात कोकम आणि मीठ घालावे मुशी चांगली शिजून द्यावी
टीप:-
१) मुशी ३-४ पाण्यातून स्वच्छ धुवून काढावी नाहीतर त्याला वैस वास येतो
२)मीठ घालताना पहिलं जरा कमी घाला करण आपण मुशीला पण मीठ लावलेलं आहे
३)मालवणी मसाला नसेल तर २चमचे लाल तिखट+१ चमचा गरम मसाला घ्यावा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
कडीपत्ता हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतोसच पण
आज आपण बघणार आहोत कडीपत्ता ची चटणी
साहित्य:-
कडीपत्याची पाने
१चमचा तेल
१/२ चमचा जिरं
१/२वाटी शेंगदाणे
१/२वाटी फुटण्याची डाळ
१चमचा तिखट
१चमचा गूळ किंवा साखर
मीठ
कृती:-
१) कडीपत्ता चांगला धुवून पाने नीट पुसून घ्यावे
एक पातेल्यात तेल घालून त्यात कडीपत्ता कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या
२)जिरं,फुटाण्याची डाळ ,शेंगदाणे वेगळे वेगळे भाजून घ्यावे
३) कडीपत्ता ,तिखट,गूळ/साखर,मीठआणि भाजलेले जिन्नस मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे
ही चटणी सर्व रस्सा भाज्या तसेच दह्यात कालवून डोसा, थालीपीठ, धपाटे किंवा नुसती सुद्धा गरम भाकरी बरोबर अप्रतिम लागते
शिवाय कडीपत्ता ही पोटात जातो.
टीप:-
१)सुकं खोबरं पण वापरू शकतात किसून भाजून मिक्सर मधून काढावे (मी वापरले नाही आहे )
२)जर चटणीला थकड आंबट पण हवे असेल तर त्यात १/२ चमचा आमचूर पावडर घालावी
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया बांगड्याचे कालवण
साहित्य :-
४बांगडे कापून स्वच्छ धुवून घेणे
१/२ वाटी खवलेला नारळ
५-६ पाकळ्या लसूण
१कांदा(१/२ वाटणात आणि १/२ बारीक चिरलेला फोडणीसाठी)
१/२ चमचा हळद
५-६ बेडगी मीरची
१चमचा तांदूळ
२चमचे धने
३-४ कोकम
तेल
मीठ पाणी
कृती
१) मिरच्या ,तांदूळ आणि धणे एका भांड्यात २० मिनिटे भिजत घालावे
२) बांगड्यांना थोडं मीठ आणि हळद लावून घ्यावे
३) मिक्सर च्या भांड्यात लावलेला नारळ,भिजवलेल्या लाल मिरच्या,धने,तांदूळ ,लसूण,कांदा,पाणी घालून वाटून घ्यावे
४) एका लागडीमध्ये २-३चमचे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून फोडणी करावी
५) त्यात वाटलेलं वाटण आणि थोडं पाणी घालावे कोकम घालावे आणि छान उकळी येउद्यावी
६) छान उकळी आल्यावर त्यात अलगत बांगड्याच्या तुकड्या सोडाव्यात ५ते १० मिनिटे शिजू द्यावे
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
आज आपण बघुया ताकाची कढी
साहित्य:
१ वाटी दही
१ १/२ वाटी पाणी
१/४ चमचा किसलेले आले
१ हिरवी मिरची बारीक़ चिरलेली
थोडी कोथिंबीर बारीक़ चिरलेली
१/४ चमचा हळद
१/४ चमचा साखर
मीठ
फोडणी साठी:
३ चमचे तेल
१/४ चमचे राई
३-४ कढीपत्ताची पाने
१/४चमचे हिंग
कृती:
१)सर्व प्रथम दह्यात पाणी घालून त्याचे ताक करून घ्या.
२)ताकात आले ,हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, साखर, मीठ,हळद घालून व्यवस्थित एकजीव करा.
३)तयार मिश्रण गॅस वर ठेऊन सतत ढवळा. नाहीतर ताक फुटण्याची शक्यता असते.
४)एकीकडे फोडणीच्या कढईत तेल तापत ठेवा.
५) गॅसवरचे मिश्रण उकळणार असे वाटल्यास लगेच गॅस बंद करा.
६) दुसरीकडे फोडणीचे तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला. राई तडतडल्यावर
कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घालून ताकाला फोडणी द्या आणि गरम भातावर
वाढा.
टीप:-
१) कढीला थोडा घट्टपणा येण्या करीता त्यात १ चमचा बेसन ४चमचे पाण्यात घालून त्याची पेस्ट ताकात घालावी
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार,
आज आपण बघणार आहोत कोलंबी भात किंवा कोलंबीची खिचडी
साहित्य:
१ वाटी सोललेल्या कोलंब्या
२पेले बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)
२कांदे उभे चिरलेले
२टोमॅटो बारीक चिरलेला
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
३-४ चमचे मालवणी मसाला किंव्हा (२ चमचे लाल तिखट + १ चमचा गरम मसाला)
१/२ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
तेल
१चमचा साजुक तूप
१चमचा शहाजिरे
२-३ तमालपत्र
२ चाक्रीफुल
२ मसाला वेलची
७-८ काळीमिरी
४-५ लवंगा
२ इंच दालचिनी तुकडा
१ वाटी नारळाचे दुध
३ पेले गरम पाणी
१/२वाटी कोथिंबीर
कृती:
१)कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला
थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास
मुरत ठेवावी.
२)तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा.
३)पातेल्यात३-४ चमचे तेल गरम करा. अख्खे/खडे मसाले फोडणीला घाला.
त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता.
४)तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला.
एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला.
५)हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.
टीप :
१)मोठ्या कोलंबी पेक्षा लहान कोलंबी या भातात चांगला लागतो.
२)नारळाचे दुध नसेल तर पूर्ण पाणी वापरले तरी चालेल. (म्हणजे २ पेले तांदूळ = ४ पेले पाणी)
३) बटाटा आवडत असेल २बटाट्याच्या मध्यम फोडी करून घालाव्यात .
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार,
आज आपण बिर्याणी स्पेशल रेसिपी मध्येये बघुया चिकन बिर्याणी
साहित्य :-
१/२ किलो चिकन
★मॅरीनेट करण्यासाठी-
२ चमचे दही+ १ चमचा सोया सॉस+ १" आले,४ -५ लसूण पाकळ्या,२ हिरव्या मिरच्या यांची पेस्ट
( सगळा मसाला लावून चिकन २ -३ तास आधी मॅरीनेट करून ठेवा.)
★भातासाठी-
१ १/२ पेला बासमती तांदूळ
३ पेले पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलदोडे, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी)
★चिकनच्या ग्रेवीसाठी -
१ १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ १/२ चमचा लाल तिखट
१ तमालपत्र
★मसाला वाटण १ :- १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, खसखस
★मसाला वाटण २ :- १ चमचा धने, १ चमचा शहाजिरे / जिरे, ३-४ लवंगा, ५-६ काळी मिरी, १" दालचिनीचा तुकडा
तळण्यासाठी- १ कप उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू,
तेल
मीठ चवीप्रमाणे
केवडा इसेन्स (optional )
केशर चिमुटभर आणि ४ चमचे दुध (optional)
कृती :
१)सर्व प्रथम तांदूळ १० मिनिटे आधी धुवून ठेवा.
एका पातेल्यात 3 चमचे तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा
मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ
सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट (इथे 3 पेले) गरम पाणी घाला. मीठ
घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.
२) भात पूर्ण शिजला
कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे.चमच्याने भात वर खाली करा म्हणजे
भाताचे शीत मोडणार नाही. आणि भात छान मोकळा होईल.
३)एकीकडे कढईत पुरेसे तेल गरम करा. तेलात काजू तळून घ्या. काजू लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
४)नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत टाळून
घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर चिकनच्या
ग्रेवीसाठी त्याच्यातच ठेवून द्या.
५)खसखस गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे ती शिजेल.
६)मसाला वाटण no.१ मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
७) मसाला वाटण no.२ ची बारीक पावडर करून घ्या.
( रेडीमेड गरम मसाला पावडर १/४ च. वापरली तरी चालेल.)
८)उरलेल्या तळणीच्या तेलात तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
९) मग मसाला वाटण no.१ घालून परता. खमंग वास सुटला कि. मसाला वाटण no.२ घालून परता.
१०)१-२ मिनिटे परतल्यावर हळद,१ चमचा लाल तिखट , मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
११)मग मॅरीनेट केलेले चिकन घालून २-३ मिनिटे परता. झाकण ठेवून १ वाफ काढा.
१२) १ १/४ पेले पाणी घाला. वरून झाकण ठेऊन चिकन छान शिजू द्या.
१३)चिकनची ग्रेवी तयार झाली कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. १ चमचा कोमट दुधात केशर खलून ठेवा.
१४)नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात सर्वात खाली भाताचा थोडा जाड थर
करा.त्यावर तळलेला कांदा, काजू घाला. वरती थोडी चिकनची ग्रेवी घाला. मग परत
भाताचा थर.वरती कांदा, काजू वरती चिकनच्या ग्रेवीचा थर. असे एकावर एक थर
करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काज,कोथिंबीर
आणि पुदिन्याची पाने घालून सजवा
१५)थरांना चमच्याच्या दांड्याने वेगवेगळ्या जागी ३-४ छोटी भोकं पाडा.
त्यातून केशरी दुध आणि १ झाकण केवडा इसेन्स घाला.
१६)भोक बुजवा आणि झाकण ठेऊन १-२ वाफा काढा.
१७)बिर्याणी उभा डाव घालून थर न मोडता रायत्या सोबत सर्व्ह करा .
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा आज आपण बघुया मुगाचे कढण
साहित्य:-
१मोठी वाटी मूग डाळ
१वाटी गुळ
१/२चमचा वेलची पूड
१/२वाटी काजू तुकडा
१पेला नारळाचे जाड दूध
पाणी
कणभर मीठ
कृती:-
१) एका पातेल्यात ५-६पेले पाणी तापत ठेवा
२) दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात मुगाची डाळ भाजून घ्या .डाळीचा रंग
बदलला की त्यात गरम पाणी घाला आणि डाळ चांगली शिजू दया.(पूर्ण डाळ
शिजवायची नाही डाळ अख्खी दिसली पाहिजे)
३) त्यात गुळ घाला .गुळ विरघळला की त्यात वेलचीपूड,काजू तुकडा आणि कणभर मीठ घाला आणि चांगली उकळी येऊद्या
जर डाळ घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घाला
४) छान उकळल्यावर त्यात नारळाचे दूध घालावे
आणि मिश्रण चांगले एकजीव करावे आणि परत एक उकळी येऊ द्या.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
नमस्कार
बिर्याणी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण बघुया पनीर बिर्याणी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
३-४ वेलची, ३-४ तमालपत्र, ३-४ लवंगा, १ लहान दालचिनीची तुकडा
चवीपुरते मिठ
★पनीर मॅरीनेशन
२५० ग्रॅम पनीर, १/२ कप दही, १ चमचा आलेलसूण पेस्ट, १/४ चमचा मिठ
★ग्रेव्ही
१ कप कांदा उभा पातळ चिरून
४-५ टोमॅटो, २ चमचे आलेलसूण पेस्ट, २ चमचे तूप
खडा गरम मसाला - २ वेलची, ३-४ लवंगा, ३-४ मिरीदाणे, २-३ तमालपत्र
२चमचे धने जिरं पूड
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लाल तिखट
१ कप मिल्क पावडर किंवा १/२ कप क्रिम
चवीपुरते मिठ
साधारण पाऊण ते एक पेला भाज्यांचे तुकडे :- मटार, गाजर लहान तुकडे, फरसबी तुकडे
इतर साहित्य
४ चमचे तूप + अजून तूप ऐच्छिक
१ पेला कांद्याचे पातळ उभे काप
८ ते १० काजू
१/४ वाटी पुदीना बारीक चिरलेला
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
२ चमचे दूध + ३ ते ४ केशराच्या काड्या
कृती:
★पनीर
दही फेटून घ्यावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मिठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे.
★भात
१) तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. एका पातेल्यात ६ कप पाणी
गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मिठ घालून
पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात
साधारण ६० ते ७० % शिजला कि चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून
टाकावे. तयार भात परातीत मोकळा करून गार होण्यास ठेवावा.
★ग्रेव्ही:-
१) पाणी उकळवावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनीटांनी गार पाण्यात सोडावे.
सालं सुटली कि काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात.
२)
कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण
पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या
टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतावे आणि लाल तिखट घालावे.
३) हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी.
४) कढईत साधारण २ चमचे तूप गरम करावे. यामध्ये काजू परतून बाजूला काढून
ठेवावे. याच तुपात हि प्युरी परत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी.
त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर किंवा फ्रेश क्रीम
घालावे ,भाज्या घालाव्यात. निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे. चवीपुरते मिठ
घालावे. हि ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी . ग्रेव्ही दाटसर
होत आली कि पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी.
◆तळलेला कांदा
तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ वाटी) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा.
◆बिर्याणी
एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली कि भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान
भाग करून घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात पहिले तूप सोडावे आणि पसरवून
घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग
समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू
घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला कि त्यावर
तळलेला कांदा, उरलेले काजू दूधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट
झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा नये. एकदम मंद आचेवर १५ ते २० मिनीटे वाफ
काढावी. गरम गरम बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) ग्रेव्ही पातळ नसावी. पातळ ग्रेव्हीमुळे बिर्याणी बनवताना भाताची शिते
मोडतात आणि भात मोकळा न होता ओलसर आणि गच्च होतो. बिर्याणीचे थर करताना
पसरता येईल इतपत दाट ठेवावी.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून
वरीलप्रमाणेच थर करावे. आणि डायरेक्ट गॅसवर न ठेवता खाली एक तवा ठेवावा
त्यावर भांडे ठेवावे म्हणजे भात करपणार नाही.
३) प्रत्येक थरामध्ये पातळ केलेले तूप गरजेनुसार घालावे. यामुळे बिर्याणीला खुपच छान चव येते.
४) शक्यतो मिल्क पावडर वापरावी म्हणजे ग्रेव्हीला दाटपणा लगेच येतो. तसेच
क्रिम वापरणार असाल तर क्रिम घातल्यावर ते ग्रेव्हीमध्ये निट मिक्स
होईस्तोवर ढवळा म्हणजे ते ग्रेव्ही फुटणार नाही.
५) जर केशर नसेल तर चिमूटभर खायचा केशरी रंग २ चमचे दूधात घालून तो वापरावा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/